‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही छोट्या पडद्यावरील सर्वांत लोकप्रिय मालिका आहे. गेल्या 15 वर्षांपासून सातत्याने ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. आजसुद्धा या मालिकेचे असंख्य चाहते आहेत. यातील बरेच कलाकार बदलले, तरीसुद्धा टीआरपीच्या यादीत ही मालिका अव्वल ठरते. परंतु ही मालिका त्याच्याशी संबंधित विविध वादांमुळेही सतत चर्चेत असते. यातील काही कलाकारांनी निर्मात्यांवर आरोप केले होते, तर आता मालिकेतील एका अभिनेत्रीने करार मोडल्याची चर्चा आहे.
मालिकेत सोनू भिडेची भूमिका साकारणारी अभिनेत्री पलक सिंधवानीने प्रॉडक्शन हाऊससोबत आपला करार मोडल्याचं म्हटलं जातंय. यानंतर निर्माते असित कुमार मोदी हे तिच्याविरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचं कळतंय. या चर्चांवर आता खुद्द पलकने प्रतिक्रिया दिली आहे. ‘टाइम्स नाऊ’ला दिलेल्या मुलाखतीत पलकने या चर्चांबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. तिने या चर्चांना खोटं म्हटलंय. “माझी बाजू समजून न घेता अशा अफवा कोण पसरवतं माहीत नाही. मी कोणताच करार मोडलेला नाही”, असं तिने स्पष्ट केलंय.
‘तारक मेहता..’ या मालिकेच्या कथानकात आणि कलाकारांमध्ये बरेच बदल झाले आहेत. सध्या या मालिकेत गणपती उत्सवाचा ट्रॅक सुरू आहे. या खास एपिसोडमध्ये पाहुण्यांनाही आमंत्रित करण्यात आलं आहे. मालिकेत उपस्थित राहणारा हा पाहुणा दुसरा-तिसरा कोणी नसून पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये कांस्यपदक जिंकणारा भारतीय पहलवान अमन सहरावत आहे.
या मालिकेत गोलीची भूमिका साकारणारा अभिनेता कुश शाहने काही दिवसांपूर्वीच मालिकेला रामराम केला होता. मालिकेत त्याने त्याच्या विनोदाच्या अचूक टायमिंगने आणि परफॉर्मन्सने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्याने साकारलेली गोलीची भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडली आहे. आतापर्यंत या मालिकेतून बऱ्याच कलाकारांची एक्झिट झाली आहे. यामध्ये दयाबेनची भूमिका साकारणारी दिशा वकानी, टप्पूची भूमिका साकारणारा राज अनाडकर, तारक मेहताची भूमिका साकारणारे शैलेश लोढा, सोनूची भूमिका साकारणारी झील मेहता यांचा समावेश आहे.