बॉलिवूडमध्ये अशा अनेक जोड्या आहेत, ज्यांच्या अफेअरच्या चर्चा आजही चवीने चघळल्या जातात. अशीच एक जोडी म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री तब्बू आणि दाक्षिणात्य अभिनेता नागार्जुन. हे दोघं जवळपास दहा वर्षे एकमेकांना डेट करत होते. आता बऱ्याच वर्षांनंतर पुन्हा एकदा ही जोडी चर्चेत येण्यामागचं कारण म्हणजे तब्बूची कमेंट. ‘फादर्स डे’निमित्त अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर त्यांच्या वडिलांसोबत फोटो पोस्ट केले होते. यावेळी अभिनेता नाग चैतन्यनेही वडील नागार्जुन यांच्यासोबतचा फोटो पोस्ट केला. या फोटोमध्ये लहानपणीचा नाग चैतन्य आणि तरुणपणीचे नागार्जुन पहायला मिळत आहेत. याच फोटोवर तब्बूने कमेंट केल्याने चर्चांना उधाण आलं आहे. तब्बूची कमेंट पाहून नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
नाग चैतन्यने पोस्ट केलेल्या या फोटोवर तब्बूने हृदयाचे इमोजी पोस्ट केले आहेत. त्यावर नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. नागार्जुन आणि तब्बू हे त्यांच्या रिलेशनशिपबद्दल कधीच मोकळेपणे व्यक्त झाले नव्हते. 2017 मध्ये ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत नागार्जुन म्हणाले, “होय, तब्बू ही माझी खूप चांगली मैत्रीण आहे. आमची मैत्री खूप जुनी आहे. मी 21-22 वर्षांचा आणि ती 16 वर्षांची असल्यापासून आम्ही एकमेकांचे मित्रमैत्रिणी आहोत. म्हणजे हे जणू आमचं अर्ध आयुष्यच झालं आहे. त्यामुळे आमच्या मैत्रीबद्दल जितकं बोलावं तितकं कमीच आहे. तिच्याबद्दल लपवण्यासारखं असं काहीच नाही. जेव्हा तुम्ही तिचं नाव घेतलंत, तेव्हा माझा चेहरा लगेच खुलला. हे नातं इतकं साधंसरळ आहे. आता जेव्हा मी अशा गोष्टी बोलतो, तेव्हा त्यातून जर तुम्ही काही वेगळा अर्थ काढत असाल, तर तो तुमचा दृष्टीकोन आहे. माझ्यासाठी ती खूप सुंदर व्यक्ती आणि सुंदर मैत्रीण आहे. ती नेहमीच माझी मैत्रीण राहील.”
नागार्जुन आणि तब्बू यांनी दोन तेलुगू चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं. यापैकी ‘निन्ने पेल्लडता’ हा रोमँटिक फॅमिली ड्रामा होता. या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार पटकावला होता. तब्बू लवकरच अजय देवगणसोबत ‘औरों में कहा दम था’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये जिमी शेरगिल, शांतनू महेश्वरी आणि सई मांजरेकर यांच्याही भूमिका आहेत.