तमिळनाडू | 4 ऑगस्ट 2023 : तमिळ टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील अभिनेत्री श्रुती शनमुग प्रियाच्या पतीचं निधन झालं. अरविंद शेखर याचं 2 ऑगस्ट रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. वयाच्या अवघ्या तिसाव्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला. अरविंद हा बॉडीबिल्डर आणि माजी मिस्टर तमिळनाडू होता. गेल्याच महिन्यात श्रुती आणि अरविंदने लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला होता. पतीच्या निधनानंतर श्रुतीने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट लिहिली आहे.
‘फक्त तुझं शरीर माझ्यापासून दूर गेलं आहे. मात्र तुझी आत्मा आणि मन आता आणि नेहमीच माझ्याजवळ असेल, माझं रक्षण करेल. तुझ्या आत्म्याला शांती मिळो. तुझ्यासाठी असलेलं माझं प्रेम दिवसागणिक वाढतच जाणार आहे. आपल्या असंख्य आठवणी मी आयुष्यभर माझ्यासोबत ठेवणार आहे. मिस यू आणि लव्ह यू अरविंद. तू आताही माझ्यासोबतच आहेस’, अशा शब्दांत श्रुतीने भावना व्यक्त केल्या आहेत.
श्रुतीने सोशल मीडियावर अरविंदचा एक व्हिडीओसुद्धा शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो एका पार्टीत धमाल करताना दिसत आहे. ‘ती रात्र पुन्हा जगण्यासाठी मी काहीही करू शकते. त्या पार्टीत आपण मनसोक्त नाचलो, हसले आणि गाणी गायली. तुझ्यासोबतच्या खूप साऱ्या आठवणी माझ्या मनात कायम राहतील’, असं तिने लिहिलंय. श्रुतीच्या या पोस्टवर तमिळ टीव्ही इंडस्ट्रीतील कलाकारांकडून आणि नेटकऱ्यांकडून शोक व्यक्त केला जात आहे. अनेकांनी तिला आधार देण्याचा प्रयत्न केला आहे.
श्रुती आणि अरविंद यांनी काही वर्षे डेट केल्यानंतर गेल्या वर्षी मे महिन्यात लग्न केलं. अरविंद हा सिव्हिल इंजीनिअर आणि फिटनेस कोचसुद्धा आहे. 2022 मध्ये त्याने मिस्टर तमिळनाडू चॅम्पियनशिप जिंकलं होतं. तर श्रुती ही तमिळ टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने ‘नादस्वरम’ या लोकप्रिय टीव्ही शोमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारली. याशिवाय ती वनी राणी, कल्याण पारिसू, पूनूंजल यांसारख्या मालिकांमध्येही काम केलं आहे. याशिवाय ती काही चित्रपटांमध्येही झळकली.