मुंबई : 10 डिसेंबर 2023 | अभिनेत्री तनुश्री दत्ता सध्या चित्रपटांपासून दूर असली तरी सोशल मीडियावर ती कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असते. ‘मी टू’ मोहिमेअंतर्गत तिने ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. आता तनुश्री तिच्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आली आहे. ‘आशिक बनाया आपने’ या चित्रपटातील तिची इमरान हाश्मीसोबतची केमिस्ट्री विशेष चर्चेत होती. या चित्रपटातील इमरानसोबतच्या किसिंग सीनबद्दल आता तनुश्री मोकळेपणे व्यक्त झाली आहे. 18 वर्षांनंतर तनुश्रीने याची कबुली दिली की, किसिंग सीन करताना ती कम्फर्टेबल नव्हती.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तनुश्रीने सांगितलं, “माझ्यासाठी इमरान हाश्मी हा पहिल्या दिवसापासूनच फक्त एक अभिनेता होता. मी त्याच्यासोबत तीन चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं. चॉकलेट या चित्रपटातही आमचा किसिंग सीन होता, पण नंतर तो चित्रपटातून काढून टाकण्यात आला. पण अशा प्रकारचे सीन्स शूट करणं माझ्यासाठी पहिल्यांदा खूप विचित्र होतं. दुसऱ्या वेळी थोडंसं कमी विचित्र वाटलं. कारण खऱ्या आयुष्यात माझी इमरानसोबत कोणती मैत्री किंवा आमच्यात कोणतीच केमिस्ट्री नव्हती.”
यावेळी इमरान हाश्मीबद्दल बोलताना ती पुढे म्हणाली, “त्याची इंडस्ट्रीत जरी किसर बॉय अशी छवी असली तरी किसिंग सीन करताना तोच सर्वांत अन्कम्फर्टेबल असतो. त्याचं असं म्हणणं असतं की मी सहज किसर नाही किंवा सहज अभिनेताही नाही.” तनुश्री दत्ताने 2005 मध्ये ‘आशिक बनाया आपने’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. यामधील तिची आणि इमरान हाश्मीची केमिस्ट्री विशेष चर्चेत होती. त्यानंतर ‘चॉकलेट : डीप डार्क सीक्रेट्स’ आणि ‘गुड बॉय, बॅड बॉय’ या दोन चित्रपटांमध्येही दोघांनी एकत्र काम केलं. तनुश्रीने ‘रकीब : राइवल्स इन लव्ह’, ‘ढोल’, ‘सास बहू और सेंसेक्स’ यांसारख्या चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत.
तनुश्री 2020 मध्ये ‘मी टू’ मोहिमेमुळे चर्चेत आली होती. तिने नाना पाटेकर यांच्यावर गैरवर्तणुकीचा आरोप केला होता. तिच्या या आरोपांमुळे इंडस्ट्रीत मोठा गदारोळ निर्माण झाला होता. ही MeToo मोहीम त्यावेळी चांगलीच चर्चेत होती. कारण या मोहिमेची सुरुवात भारतात तनुश्रीच्या आरोपांनी झाली.