मेहंदी कार्यक्रमात एक्स गर्लफ्रेंडबद्दल बरळला करीनाचा भाऊ; नेटकरी म्हणाले ‘निर्लज्ज’

| Updated on: Feb 20, 2025 | 12:52 PM

स्वत:च्याच मेहंदी कार्यक्रमात करीना कपूरचा चुलत भाऊ आदर जैन त्याच्या एक्स गर्लफ्रेंडबद्दल बरळला. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.

मेहंदी कार्यक्रमात एक्स गर्लफ्रेंडबद्दल बरळला करीनाचा भाऊ; नेटकरी म्हणाले निर्लज्ज
तारा सुतारिया, आदर जैन, आलेखा अडवाणी
Image Credit source: Instagram
Follow us on

दिवंगत अभिनेते राज कपूर यांचा नातू आदर जैन लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. गर्लफ्रेंड आलेखा अडवाणीसोबत आदर लग्न करणार असून नुकताच या दोघांचा मेहंदी आणि संगीताचा कार्यक्रम धूमधडाक्यात पार पडला. या कार्यक्रमाला कपूर कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते. आदर हा राज कपूर यांची कन्या रिमा जैन आणि मनोज जैन यांचा मुलगा आहे. आलेखा अडवाणीच्या आधी तो अभिनेत्री तारा सुतारियाला डेट करत होता. आता मेहंदी कार्यक्रमात आदरने त्याच्या होणाऱ्या पत्नीविषयीच्या भावना व्यक्त केल्या आहेत. मात्र असं करताना त्याने अप्रत्यक्षपणे तारासोबतच्या नात्याबद्दल टिप्पणी केली आहे. “गेल्या चार वर्षांपासून मी टाइमपास करत होतो”, असं तो म्हणाला. आदर आणि आलेखाच्या मेहंदीला रणबीर कपूर, आलिया भट्ट, करीना आणि करिश्मा कपूर, सोनी राजदान हे सर्वजण उपस्थित होते.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये आदर आलेखाबद्दल भावना व्यक्त करताना म्हणतोय, “मी नेहमीच तिच्यावर प्रेम केलंय आणि मला तिच्यासोबतच राहायचं होतं. म्हणून तिने मला टाइमपासमधून 20 वर्षांच्या या लांब प्रवासावर पाठवलंय. पण हे सर्व प्रतीक्षा करण्यासारखं होतं. कारण मला या सुंदर स्त्रीशी लग्न करायचं होतं, जी स्वप्नवत दिसतेय. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि ही प्रतीक्षा समाधानकारक होती. हे एक गुपित आहे की मी नेहमीच तिच्यावर प्रेम केलंय. मी माझ्या आयुष्यातील चार वर्षे टाइमपास केला, पण आता मी तुझ्याचसोबत आहे बेबी.”

हे सुद्धा वाचा

आदरच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘तो किती निर्लज्ज आहे’, असं एकाने म्हटलंय. तर ‘म्हणजे तो तारा सुतारियाच्या भावनांशी खेळत होता’, असं दुसऱ्याने लिहिलंय. ‘याला काहीच लाज नाही. जर त्याला आलेखाशीच लग्न करायचं होतं तर मग तो तारासोबत काय करत होता’, असंही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.

आदर जैन आणि आलेखा अडवाणी यांनी सप्टेंबर 2024 मध्ये साखरपुडा केला. आश्चर्याची बाब म्हणजे आलेखा ही तारा सुतारियाचीही खास मैत्रीण होती. तारा आणि आदर एकमेकांना डेट करताना आलेखालाही त्यांच्यासोबत पाहिलं गेलं होतं. ताराने कपूर कुटुंबीयांच्या विविध कार्यक्रमांनाही आदरसोबत हजेरी लावली होती. त्यामुळे ताराच कपूर कुटुंबाची सून होणार असल्याची चर्चा होती. मात्र 2023 मध्ये या दोघांचा ब्रेकअप झाला. त्यानंतर आदर आलेखाला डेट करू लागला.