वेबविश्वाला हादरवून टाकणारा ‘रानबाजार’ (Raanbaazaar) अशा टॅगलाइनसह प्लॅनेट मराठीच्या आगामी वेब सीरिजचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. या टीझरमधील तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) आणि प्राजक्ता माळी (Prajakta Mali) यांच्या सुपरबोल्ड अंदाजाने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलंय. येत्या 18 मे रोजी या सीरिजचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र त्यापूर्वीच टीझरची जोरदार चर्चा आहे. तेजस्विनी आणि प्राजक्ता या सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत असून एका दिवसात ‘रानबाजार’च्या टीझरला 10 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तेजस्विनीला प्रेक्षकांनी याआधीही बोल्ड भूमिकेत पाहिलंय. मात्र प्राजक्ताला इतक्या बोल्ड अंदाजात पहिल्यांदाज पाहिलं जातंय. ‘आजवर आपण तिला अनेक भूमिका साकारताना पाहिलं. एक कलाकार म्हणून स्वतःला एका चौकटीत न बांधता आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या संपूर्ण विरोधी भूमिका साकारण्याचा प्रयत्न प्राजक्तानं ‘रानबाजार’मध्ये केलाय,’ अशी पोस्ट तेजस्विनीनं तिच्यासाठी लिहिली. तेजस्विनी आणि प्राजक्ताच्या दोन्ही टीझरवर नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी या भूमिकांवरून त्यांना ट्रोलही केलंय.
‘ओटीटी प्लॅटफॉर्म हा जणू सेमी-पॉर्नसाठी बनलाय असं वाटू लागलंय. न्युडिटी, बोल्ड आणि वादग्रस्त कंटेट म्हणजेच ओटीटी नव्हे. जरा चौकटीबाहेर विचार करा’, अशा शब्दांत एका नेटकऱ्याने टीका केली. तर ‘टीझर आवडला नसेल पण त्याकडे भूमिका म्हणून पहा. भूमिकेमुळे अभिनेत्रींविषयी मतं तयार करू नका’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘मराठी इंडस्ट्रीतील हे क्रांतीकारी पाऊल आहे’, असंही एकाने लिहिलंय. याविरुद्ध ‘मराठी इंडस्ट्रीसुद्धा आता न्युडिटीकडे वळू लागली आहे’, असं दुसऱ्या युजरने लिहिलं.
तेजस्विनी आणि प्राजक्ताच्या या टीझरवर अर्चना निपाणकर, आदिनाथ कोठारे, धनश्री काडगावकर, अक्षया गुरव, ऋतुजा बागवे, पियुष रानडे यांसारख्या कलाकारांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. अभिजित पानसे दिग्दर्शित पॉलिटिकल क्राईम थ्रिलर असलेल्या या वेब सीरिजची निर्मिती अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी, रावण फ्युचर प्रॉडक्शन्स आणि अभिजित पानसे, अनिता पालांडे यांनी केली आहे. ‘रानबाजार’ येत्या 20 मे पासून ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’वर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सत्य घटनांच्या संदर्भांवर आधारित या वेब सीरिजमध्ये आजवर कधीही न पाहिलेली गोष्ट पाहायला मिळणार आहे.