अभिनेत्री तेजस्विनी पंडितच्या आयुष्यात चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं आहे. सोशल मीडियावर पोस्ट लिहित तिने चाहत्यांना ही गोड बातमी सांगितली आहे. अनेक वर्षे या सुखाचा अनुभव घेण्यासाठी आम्ही सर्वच आसुसलेले होतो, असं तिने या पोस्टमध्ये म्हटलंय. पण ही चिमुकली पाहुणी तेजस्विनीची नसून तिच्या बहिणीची आहे. तेजस्विनीच्या बहिणीने नुकतंच बाळाला जन्म दिला आहे. त्यामुळे मावशी झालेल्या तेजस्विनीच्या आनंदाला पारावार उरला नाही. इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत तिने चाहत्यांसोबत हा आनंद साजरा केला आहे.
‘माझ्यासाठीची सगळ्यात ‘मोठी’, सगळ्यात ‘खास’ आणि आयुष्यभराची ‘दिवाळी भेट’ माझ्या बहिणीने आणि दाजींने मला दिली आहे. आमच्या घरात ‘लक्ष्मी’ आली. अनेक वर्ष या सुखाचा अनुभव घेण्यासाठी आम्ही सर्वच आसुसलेले होतो. माझ्या माणसांच्या आयुष्यातला 14 वर्षांचा अपत्यप्राप्तीसाठीचा वनवास यंदाच्या दिवाळीत संपला. त्या हॉस्पिटलच्या फेऱ्या, तिथली धावपळ, अचानक उद्भवलेले अडथळे या सगळ्यात आजूबाजूला सणाचे वातावरण आहे हे विसरायला झालं होतं. पण या सगळ्यावर मात करत आमचे दिवाळीचे क्षणच नव्हे तर आयुष्य देखील या ‘कन्यारत्नाने’ उजळून टाकले. आमच्या कुटुंबाची ‘कथा’ सुफळ संपूर्ण म्हणुया? ही दिवाळी माझ्यासाठी एकदम खास आहे, मी मावशी झालेय! होऊ दे खर्च. तुम्हा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा,’ अशी पोस्ट तिने लिहिली आहे.
तेजस्विनीच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. ‘येक नंबर’मधील मुख्य अभिनेत्री सायली पाटीलने ‘किती गोड’ असं लिहिलंय. तर या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता धैर्य घोलप याने ‘सुख कळले’ असं म्हटलंय. अभिनेत्री श्रेया बुगडे, आनंदी जोशी, स्वप्निल जोशी, सावनी रविंद्र यांसारख्या सेलिब्रिटींनीही तेजस्विनीवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
तेजस्विनीसाठी 2024 हे वर्ष खूपच खास ठरलं आहे. याच वर्षी तेजस्विनी पंडित निर्मित ‘येक नंबर’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. राजेश मापुस्कर दिग्दर्शित ‘येक नंबर’ या चित्रपटाच्या निमित्ताने तिने लिखाण क्षेत्रातही पदार्पण केलं आहे. “लिखाणाची आवड पूर्वीपासून होतीच, फक्त आधी स्वतःपुरत लिहायचे, आता सिनेमासाठी लिहिलंय. खरंतर व्यक्त होणं गरजेचं असतं. काय व्यक्त होताय यावर प्लॅटफॉर्म ठरतो. मला हा विषय खूप मोठ्या स्केलवर दिसत होता म्हणून मी यावेळेला सिनेमा या माध्यमामधून व्यक्त व्हायचं ठरवलं. मोठी जबाबदारी होती आणि प्रामाणिकपणे ती पार पाडायचा प्रयत्न केलाय . मला खात्री आहे प्रेक्षकांना माझी ही भूमिका सुद्धा आवडेल,” अशी प्रतिक्रिया तिने दिली होती.