स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) या लोकप्रिय मालिकेतील कलाकारांचा सोशल मीडियावर आणि खऱ्या आयुष्यातही मोठा चाहतावर्ग आहे. या मालिकेत अनिरुद्धची भूमिका साकारणारे अभिनेते मिलिंद गवळी (Milind Gawali) हे त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्यांचे विविध अनुभव सांगत असतात. नुकताच त्यांनी पुण्यातील एका कार्यक्रमातील मजेशीर अनुभव सांगितला. हळदी-कुंकूच्या या कार्यक्रमात अरुंधती आणि संजनासोबत अनिरुद्धलाही आमंत्रित करण्यात आलं होतं. महिलांच्या कार्यक्रमात आपल्याला का बोलावलंय, असा प्रश्न पडला असतानाच कार्यक्रमातील अनुभव त्यांनी या पोस्टमध्ये लिहिला. हा तर महिलांचा अनिरुद्धला सामूहिक शिव्या देण्याचा कार्यक्रम असेल, असं त्यांना वाटलं होतं. मात्र उपस्थितांकडून मिळालेलं प्रेम पाहून ते भारावून गेले.
मिलिंद गवळी यांची पोस्ट-
‘स्टार प्रवाह हळदी कुंकू कार्यक्रम, पुणे. एक आगळा वेगळा कार्यक्रम, आगळा वेगळा कारण अनिरुद्ध देशमुखला हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला बोलावलं होतं. अरुंधती आणि संजनाला बोलावलं हे आपण समजू शकतो तो पण अनिरुद्धला? मला तर असं वाटत होतं हा तर महिलांचा सामूहिक अनिरुद्धला शिव्या देण्याचा कार्यक्रम असेल. कार्यक्रमात दीड-दोन हजार फक्त महिला, सगळ्याच अतिशय सुंदर नटलेल्या, लोकमत सखी मंचाच्या सदस्य. संजना आणि अरुंधतीला बघून सगळ्याच भारावून गेलेल्या, त्या अनिरुद्धबद्दल काय वाटत होतं देव जाणे, मी त्यांचं मन ओळखायचा प्रयत्न केला आणि भाषणांमध्ये त्यांना म्हणालो , आता मी इथे आलोच आहे तर करा मन मोकळं, घाला अनिरुद्धला शिव्या, मी थोडावेळ या कार्यक्रमात आहे तोपर्यंत मनातली भडास मोकळी करा, पण सगळे हसल्या बिचाऱ्या, हा कार्यक्रम आगळावेगळा आणखीन एका गोष्टीसाठी होता. स्पर्धेमधून तीन बायका निवडल्या होत्या, आणि फायनल त्यांची परीक्षा होती अनिरुद्ध देशमुखला लग्नाची मागणी घालणे. म्हणजे नक्कीच त्यांना वाटलं असेल आपण ‘खतरों के खिलाडी’ या कार्यक्रमात आहोत की काय. अनिरुद्ध देशमुखला प्रपोज करायचं, आणि त्या जिगरबाज बायकांनी हिम्मत दाखवून, त्यांच्या घरी त्यांना किती शिव्या पडतील याचा विचार न करता केलं अनिरुद्धला प्रपोज. सगळ्यांनाच हे बघून खूपच गंमत वाटली मजा आली सगळ्याच महिला टाळ्या वाजवत, हसत होत्या, एकमेव व्यक्ती अतिशय घाबरला होता. ज्याला काही सुचत नव्हतं, सुधरत नव्हतं आणि तो होता अनिरुद्ध देशमुख, अर्थात मीच,’ असं त्यांनी लिहिलं.
त्या दिवशीची एक आठवण सांगत त्यांनी पुढे लिहिलं, ‘त्या स्टेजवरच माझ्या मनात, अनेक विचार घोळत होते, एक विचार माझ्या आईचा होता. जिचा १३ वा स्मृतिदिन दोन तारखेलाच, म्हणजेच त्याच दिवशी होता. या दीड दोन हजार माऊल्यांच्या रूपात ती मला आशीर्वाद देत आहे असं मला वाटत होतं, एक विचार असाही आला, की पूर्वीच्या काळात असंख्य मुलींनी एकदाही न बघता आई-वडील जे ठरवून देतील त्या व्यक्तीशी लग्न केलं, माझ्या आईने सुद्धा माझ्या वडिलांना एकदाच लग्नाच्या आधी दुरून पाहिलं होतं, आणि वडिलांशी 42 वर्ष सुखाचा संसार केला. तिचं नशीब चांगलं म्हणून माझ्या वडिलांसारखा एक सज्जन माणूस तिच्या नशिबात आला. पण किती अशा असंख्य महिला असतील दुर्दैवाने त्यांच्या नशिबी हे अनिरुद्ध आला असेल. त्या स्टेजवर अजून एक असा विचार आला, ज्या वेळेला आमच्या घरी आई हळदी कुंकू करायची, मी घरातून पिक्चर बघायला निघून जायचं, हळदीकुंकू संपलं की मग घरी परत यायचो, आईच्या तेराव्या स्मृतीदिनाच्या दिवशी आईने तिच्या हळदीकुंकाला मला आज घरातच थांबून घेतलं आहे. ‘आई कुठे काय करेल’ सांगता येत नाही.’
‘आई कुठे काय करते’ ही मालिका सध्या रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. आशुतोष हा देशमुख कुटुंबीयांसमोर अखेर अरुंधतीवरील त्याच्या प्रेमाची कबुली देणार आहे. ते ऐकल्यानंतर देशमुख कुटुंबीयांची आणि विशेषकरून अरुंधतीची काय प्रतिक्रिय असेल, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
हेही वाचा :
‘इतकं कठीण असतं का 25-26 वर्षांचा सुखाचा संसार विसरणं?’; मिलिंद गवळी यांची पोस्ट चर्चेत
‘जात.. जात नाही तोवर…’; नागराज मंजुळेंच्या ‘झुंड’वर टीका करणाऱ्यांना केदार शिंदेंचं सडेतोड उत्तर