मुंबई : छोट्या पडद्यावरची ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका प्रचंड गाजते आहे. मालिकेचं भावनिक कथानक आणि एका आईची गगनभरारी असा आशय घेऊन पुढे चाललेली ही मालिका प्रेक्षकांना देखील प्रचंड भावते आहे. मात्र, आता मालिकेत एक नवं वळण आलं आहे. घटस्फोट झाल्यानंतर आता आई अर्थात ‘अरुंधती’च्या आयुष्यात एका नव्या व्यक्तीची एन्ट्री झाली आहे.
अभिनेता ओंकार गोवर्धन याची या मालिकेत एन्ट्री झाली आहे. ओंकार या मालिकेत अरुंधतीचा मित्र ‘आशुतोष केळकर म्हणून दिसतो आहे. अरुंधतीच्या महाविद्यालयीन जीवनातील हा मित्र पुन्हा एकदा तिच्या आयुष्यात एन्ट्री करत आहे. यासोबतच मालिकेत एक नवा ट्वीस्ट पाहायला मिळणार आहे. या मित्राच्या येण्याने आता अरुंधतीच्या आयुष्यात काय काय बदल होणार की, देशमुखांच्या घरात नवा हंगामा होणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे. सुरुवातीला ही भूमिका अभिनेते समीर धर्माधिकारी साकारणार अशी चर्चा रंगली होती. माध्यमांच्या अहवालानुसार यावर शिक्कामोर्तब देखील झाला होता. मात्र, आता त्यांच्या जागी ‘सावित्रीज्योती’ फेम अभिनेता ओंकार गोवर्धन दिसतो आहे.
‘आई कुठे करते’ या मालिकेत आशुतोष केळकर हा एक प्रसिद्ध बिझनेसमॅन दाखवला आहे. हा व्यक्ती संगीतक्षेत्रात कार्यरत आहे. मात्र, त्याचे इतर अनेकही व्यवसाय आहेत. ज्यापैकी एक ‘बिल्डर’ अशीही त्याची ख्याती आहे. हा आशुतोष अरुंधती आणि देविका यांचा कॉलेजमधील वर्गमित्र असून, त्याकाळापासून अरुंधती आणि तिचं गाणं त्याला आवडत होतं असं या कथानकात दाखवण्यात आलं आहे. गेले 26 वर्ष तो अमेरिकत राहत असल्याने, त्याची आणि अरुंधतीची भेट झालीच नव्हती. मात्र, आयुष्याच्या एका वेगळ्या टप्प्यावर आता त्यांची भेट झाली आहे.
एकीकडे अरुंधती घटस्फोट घेऊन स्वतःच्या पायावर उभी राहायचा प्रयत्न करत आहे. तर, दुसरीकडे अविनाशला मदत केल्यामुळे की आता कर्जाच्या ओझ्याखाली दबली आहे. अरुंधतीने अप्पांनी तिच्या नवे केलेला घराचा अर्धा हिस्सा तारण म्हणून ठेवून जवळपास 25 लाख रुपयांचे कर्ज घेऊन ते अविनाशला देऊ केले होते. ही गोष्ट घरातील लोकांना कळताच सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसला आहे. तर, याबदल्यात आता संजनाने देखील उर्वरित घर विक म्हणून अनिरुद्धच्या मागे तगादा लावला आहे. त्यामुळे अरुंधती एक वेगळ्याच संकटात सापडली आहे. त्यात आता आशुतोषची तिच्या आयुष्यात एन्ट्री कथानकाला एक वेगळं वळण देणार आहे.
मालिकेत आता आशुतोष केळकर हा भारतात त्याची संगीत अकादमी सुरु करण्याची योजना आखत असल्याचे दाखवले गेले आहे. यानंतर आता तो हे संगीत अकादमी सुरु करून, त्यात अरुंधतीला नोकरी देऊ करेल किंवा तिचा या नव्या उद्योगात भागीदार करून घेईल. यामुळे अरुंधतीच्या आयुष्यात आशेचा नवा किरण देखील येईल.