आपल्या चारित्र्यावर चिखलफेक करणाऱ्यांच्या घरातून अरुंधती (Arundhati) कायमस्वरुपी बाहेर पडली आहे. मात्र बाहेरचं जग तिला मोकळ्या मनाने स्वीकारायला अजूनही तयार नाही. एकट्या बाईला भाड्याने घर द्यायला, जागा द्यायला लोकं फार खळखळ करत असल्याची तक्रार आशुतोष (Ashutosh) त्याच्या आईकडे करतो. हे ऐकून आशुतोषची आई त्यांच्यासोबत घडलेला प्रसंग सांगते. त्याचप्रमाणे आपल्या समाजात एकट्या बाईने राहणं सोपं का नाही, हे सांगते. स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेत या घडामोडी घडत असतानाच एका महत्त्वाच्या मुद्द्यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. “आपल्याकडे फॅमिली स्ट्रक्चरमधून बाहेर पडलेली बाई ही लोकांना झेपतच नाही,” हा आशुतोषच्या आईच्या तोंडी असलेला संवाद म्हणजे सणसणीत चपराकच आहे. आता अरुंधतीपुढे असलेल्या या नव्या समस्यांचा सामना ती कशी करते, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
“आपल्याकडे फॅमिली स्ट्रक्चरमधून बाहेर पडलेली बाई ही लोकांना झेपतच नाही. एकवेळ तिचा नवरा गेलेला असला तर ठीक आहे, पण नवरा सोडून आलेली बाई म्हणजे तिच्याच काहीतरी भयंकर प्रॉब्लेम असणार असं गृहितच धरतात. यालाच घाबरून अनेक बायका मनाविरुद्ध संसार करतात, वर्षानुवर्षं सोसत राहतात. एकटीनं राहण्यासाठी वेगळी शक्ती लागते आणि कुठल्याच अर्थाने ते सोपं नाहीये,” अशा शब्दांत आशुतोषची आई त्याला अरुंधतीची बाजू समजावून सांगते. हे सांगत असताना एखाद्या बाईला सहानुभूती किंवा दया नाही तर तिच्याकडे नॉर्मल व्यक्ती म्हणून समाजाने बघावं, एवढीच तिची अपेक्षा असते, हे त्या अधोरेखित करतात.
‘आई कुठे काय करते’ या मालिकेचं कथानक आता उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. अरुंधती तिच्यासमोर आलेल्या अडचणींचा सामना कसा करेल, त्यात आशुतोष तिची काही मदत करू शकेल का, अनिरुद्ध आणि कांचन देशमुख यांना त्यांची चूक समजेल का, अशा सर्व प्रश्नांची उत्तरं या मालिकेच्या पुढील भागांत प्रेक्षकांना मिळतील.
संबंधित बातम्या: गालावर खळी, डोळ्यांत धुंदी.. ‘आई कुठे काय करते’मधल्या ‘अरुंधती’चा मोहक अंदाज
संबंधित बातम्या: एकटी बाई म्हणजे जोखिम; बुरसटलेल्या विचारांचा सामना ‘अरुंधती’ कसा करणार?