मुंबई : ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका सध्या एका नव्या वळणावर जात आहे. ही मालिका प्रचंड गाजते आहे. मालिकेचं भावनिक कथानक आणि एका आईची गगनभरारी असा आशय घेऊन पुढे चाललेली ही मालिका प्रेक्षकांना देखील प्रचंड भावते आहे. मात्र, आता मालिकेत एक नवं वळण आलं आहे. घटस्फोट झाल्यानंतर आता आई अर्थात ‘अरुंधती’च्या आयुष्यात एका नव्या व्यक्तीची एन्ट्री झाली आहे. या व्यक्तीमुळे आता अरुंधतीचं आयुष्य पूर्णपणे बदललं आहे.
अभिनेता ओंकार गोवर्धन याची या मालिकेत एन्ट्री झाली आहे. ओंकार या मालिकेत अरुंधतीचा मित्र ‘आशुतोष केळकर’ म्हणून दिसतो आहे. अरुंधतीच्या महाविद्यालयीन जीवनातील हा मित्र पुन्हा एकदा तिच्या आयुष्यात आला आहे. यासोबतच मालिकेत एक नवा ट्वीस्ट पाहायला मिळणार आहे. आता आशुतोषच्या अरुंधतीच्या आयुष्यात येण्याने आता तिचं संपूर्ण कुटुंबं तिच्या विरोधात जाताना पाहायला मिळणार आहे.
नुकतीच आशुतोषने अरुंधतीला त्याच्या अल्बममध्ये गाण्याची ऑफर दिली आहे. शिवाय अरुंधती ज्या संस्थेत काम करते ही संस्था आशुतोषची आई यांची आहे. त्यामुळे योगायोगाने अरुंधती आणि आशुतोषची सतत भेट होते. दरम्यान एका दिवशी अरुंधतीला कामावर उशीर झाल्याने आशुतोष अरुंधतीला घरी सोडण्यास जातो. याच वेळी अनिरुद्ध आणि संजना त्यांना पाहतात. यावरून अनिरुद्ध तिला काही बोल देखील लगावतो. मात्र, अरुंधती त्याला नजरंदाज करून तिथून निघून जाते.
दुसऱ्या दिवशी अनिरुद्धची आई अरुंधतीला म्हणते की, आशुतोषचं सतत असं येणं बरं दिसत नाही. यावर अरुंधती आईंना उलट उत्तर देते की, गेली 13 वर्ष संजना अनिरुद्धची मैत्रीण म्हणून या घरात येत होती, तेव्हा कोणी असा प्रश्न केला नाही. यानंतर घरातील माहोल बदलतो. या वादात उडी घेत अभिषेक देखील अरुंधतीला म्हणतो की हे चुकीचं आहे, कारण आईचा मित्र असूच शकत नाही. अर्थात आता स्वतः मुलगा देखील आईच्या विरोधात जाताना दिसणार आहे. त्यामुळे आता घरात आई विरुद्ध मुलगा असा नवा संघर्ष पाहायला मिळणार आहे.
मालिकेत आता आशुतोष केळकर हा भारतात त्याची संगीत अकादमी सुरु करण्याची योजना आखत असल्याचे दाखवले गेले आहे. यानंतर आता तो हे संगीत अकादमी सुरु करून, त्यात अरुंधतीला नोकरी देऊ करेल किंवा तिचा या नव्या उद्योगात भागीदार करून घेईल. यामुळे अरुंधतीच्या आयुष्यात तिला आता नवीन संधी मिळणार आहे.
Marathi Movie | कौतुकास्पद पाऊल, देशाच्या शेतकऱ्यांना समर्पित होणार मराठी चित्रपट ‘अजिंक्य’!