मुंबई : छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका सध्या अतिशय उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. ‘आई’ अर्थात अरुंधती आता देशमुखांच्या कुटुंबाचा भाग नसली तरी त्याच्या कुटुंबात मुलीच्या हक्काने नांदून प्रत्येकाची काळजी घेत आहे. अनिरुद्धने साथ सोडली असली तरी देशमुख कुटुंबाने अरुंधतीला नेहमीच पाठींबा दिला आहे. आता देशमुखांच्या घरात अनिरुद्धच्या भावाची देखील एंट्री झाली होती. मात्र, काही दिवसांपासून अविनाश घरात दिसला नव्हता.
अनिरुद्धचा लहान भाऊ अविनाश देशमुख हा 15 वर्षांपासून ‘समृद्धी’ आणि देशमुखांच्या कुटुंबापासून वेगळा होऊन वाशी येथे वेगळं बिऱ्हाड थाटून राहत आहे. यशचा साखरपुडा आणि अरुंधती-अनिरुद्धचा घटस्फोट या साठी त्याची पुन्हा देशमुखांच्या घरात एंट्री झाली होती. घरातल्या सगळ्यांची काळजी घेणारा अविनाश गेल्या काही भागात कामानिमित्ताने बाहेरगावी गेल्याचे दाखवले जात होते. त्याची भूमिका संपली असावी, असा अंदाज प्रेक्षक बांधत होते. मात्र, आत तो पुन्हा परतला आहे. यावेळी तो एकटा आलेला नसून सोबत संकटाचं नवं रूप घेऊन आला आहे.
अविनाश अचानक अरुंधतीला फोन करून तिला एकटीला भेटून काहीतरी सांगायचे आहे, असे बोलतो. घरी आल्यावर तो अरुंधतीला इतके दिवस कामाचं कारण सांगून बाहेर का गेला, याचं खरं कारण देखील सांगतो. तर, पत्नी नीलिमा हिला देखील माहेरी का पाठवले आहे, याचा खुलासा करतो. मुलबाळ होऊ शकत नसलेल्या नीलिमाला आणखी दुःख वाटू नये, म्हणून तिचे सगळे अवाजवी हट्ट पुरवण्यासाठी अविनाश आपण भरपूर कर्ज घेऊन ठेवल्याचे अरुंधतीला सांगतो.
व्याजाने घेतलेले पैसे आणि कर्ज आता फेडू शकत नसल्याने आपल्या मागे गुंड लागल्याचे अविनाश अरुंधतीला सांगतो. तर, हे पैसे परत केले नाही तर ते आणखी काही वाईट करू शकतात, म्हणुनच मी इथे आणि नीलिमाला तिच्या माहेरी पाठवल्याची कबुली तो देतो. आता हे कर्ज फेडण्यासाठी आपण राहत घर विकणार असून, त्यातून येणाऱ्या पैशातून ही सगळी कर्ज फेडून उरलेला पैसा बँकेत ठेवणार असल्याची योजना त्याने अरुंधतीला सांगितली आहे. मात्र, याच दिवशी हे गुंड आता अविनाशचा पाठलाग करत देशमुखांच्या ‘समृद्धी’ बंगल्यात पोहचणार आहेत.
बंगल्याच्या आवारात शिरलेले हे गुंड अविनाशला मारहाण करणार आहेत. त्याला वाचवायला गेलेल्या यशला देखील गुंडांचा मार खावा लागणार आहे. मात्र, हे प्रकरण अरुंधतीला माहित असल्याने, कदाचित पुन्हा एकदा तिलाच या सगळ्याचा सामना करावा लागणार आहे.