मुंबई : छोट्या पडद्यावर सध्या चर्चेत असलेली ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ (Yeu Kashi Tashi Mi Nandayla) ही मालिका देखील आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. मालिका शेवटच्या टप्प्याकडे सरकत असल्याने, मालिकेच्या कथानकाने जोरदार वेग पकडला आहे.
नुकताच या मालिकेत ओम आणि स्वीटूच्या लग्नाचा ट्रॅक सुरु होता. यावेळी प्रेक्ष्कानाची उत्सुकताही खूप वाढली होती. मात्र, स्वीटूचे लग्न ओमशी न होता मोहितशी झाल्याने सगळ्यांनाच धक्का बसला होता. मालिकेतील हा ट्वीस्ट अतिशय रंजक ठरला होता. मात्र, आता पुन्हा एकदा ओम आणि स्वीटू एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत. यासाठी खास मालिकेत नवी एंट्री होणार आहे. आता ही खास व्यक्ती तरी या दोघांना पुन्हा एकमेकांशी जोडेल का, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.
ओम आणि स्वीटूचं लग्न पार पडावं, अशी सगळ्या प्रेक्षकांची इच्छा होती. मात्र, तसं न झाल्याने प्रेक्षकही नाराज झाले होते. आता प्रेक्षकांची नाराजी दूर करण्यासाठी अभिनेत्री प्रिया मराठेची (Priya Marathe) या मालिकेत एंट्री होणार आहे. या मालिकेत प्रिया एका सकारात्मक व्यक्तिरेखेत दिसणार असून, ओम आणि स्वीटूला एकत्र आणण्यासाठी मदत करताना दिसणार आहे.
या मालिकेतील व्यक्तिरेखेबाबत बोलताना प्रिया मराठे म्हणाली की, ‘मालिकेत माझ्या व्यक्तिरेखेची एंट्री होणार आहे याचा मला खूप आनंद आहे. ओम आणि स्वीटू यांना पुन्हा एकदा एकत्र आणण्यात माझ्या व्यक्तिरेखेचा मोठा आणि महत्त्वाचा वाटा असणार आहे. मी एक सकारात्मक, पण तितकीच ठसकेबाज भूमिका निभावताना दिसेन. त्यामुळे ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांनाही आवडेल याची मला खात्री आहे.’
आपलं सुखाचं हक्काचं माहेर सोडून मुलगी एका वेगळ्याच कुटुंबात प्रवेश करते. असे घर जे इथून पुढे तिचं होणार असतं. या प्रवासात तिला पतीची साथ असली तरी एका जिवाभावाच्या मैत्रिणीची तिला कायमच उणीव भासत असते. अशावेळी सासूच जर तिची सखी झाली तर नात्यांचा गोडवा अधिकच वाढतो. आणि घराचं गोकुळ होतं. अशाच एका गोड नात्याची कथा सांगणारी ही मालिका आहे. अद्याप लग्नाचा ट्रॅक आला नसला तरी शकु आणि स्वीटूची नात्यानं या दोघी सासू सून आहेत. पण मनानं मैत्रीच्या धाग्यानं घट्ट बांधल्या गेल्या आहेत.मिश्किल सासू आणि खट्याळ सून मिळून घरात वेगळीच गंमत करतात. आणि या गंमतीचच नाव आहे ‘येऊ कशी तशी मी नांदायला’.