‘अगले जनम मोहे बिटिया ही किजो’ (Agle Janam Mohe Bitiya Hi Kijo) या गाजलेल्या मालिकेतील लाली ऊर्फ रतन राजपूत (Ratan Raajputh) बऱ्याच दिवसांपासून अभिनयविश्वापासून दूर आहे. ती शेवटची ‘संतोषी मां – सुनाये व्रत कथाएं’ या पौराणिक मालिकेत देवी संतोषीच्या भूमिकेत दिसली होती. याशिवाय तिने ‘विघ्नहर्ता’, ‘संतोषी मां’, ‘महाभारत‘ यांसारख्या मालिकांमध्येही काम केलं. रतनने ‘बिग बॉस 7’मध्येही भाग घेतला होता. इतकंच नव्हे तर स्वयंवर हा शोसुद्धा तिने केला होता. स्वयंवरमध्ये अभिनव शर्मासोबत लग्न झाल्यानंतर काही काळातच दोघांचं नातं तुटलं. त्यानंतर रतनने पुन्हा लग्न केलं नाही. 2020 पासून ती छोट्या पडद्यापासून पूर्णपणे गायब आहे. रतन कोणत्याही मालिकेत जर दिसत नसली तरी ती इन्स्टाग्रामवर (Instagram) बऱ्यापैकी सक्रिय असते. सोशल मीडियावरील तिचे फोटो पाहून चाहत्यांना हाच प्रश्न पडलाय की रतनने अभिनय सोडलंय का?
रतन राजपूतला गावात राहणं आवडतं. ग्लॅमरपासून दूर खेडेगावातील जगण्यावर तिचं खूप प्रेम आहे. ती तिच्या युट्यूब चॅनलवर गावाशी संबंधित तिचे व्लॉग शेअर करत असते. अशाच एका व्लॉगमध्ये ती बिहारमधील आवाडी या गावात पोहोचल्याचं पहायला मिळालं. व्हिडिओमध्ये रतन सांगते की तिथल्या गावकऱ्यांनी तिला वैयक्तिकरित्या आमंत्रित केलं आहे. त्यामुळे ती त्यांना भेटणार आहे. ती तिथल्या प्रसिद्ध सती मातेच्या डुमरेजनी मंदिरालाही भेट देते. दर्शन घेतल्यानंतर ती गावाकडे निघते. तिथे पोहोचताच गावकरी मोठ्या उत्साहात तिचं स्वागत करतात.
गावकऱ्यांशी बोलताना रतन त्यांच्यासोबत शेतातही काम करू लागते आणि तिथल्या महिलांची मदत करते. भात शेतीत ती आनंदाने सर्वांसोबत काम करताना या व्हिडीओत दिसते. तिने नुकतीस इंस्टाग्राम पोस्टदेखील शेअर केली आहे. ‘अनेकदा लोक मला विचारतात की मी गावी का फिरते? मातीने मी माझे पाय का रंगवते? कारण याच मातीत कलेचा भंडार आहे. ही माती, हे गाव मला वेगवेगळ्या रंजक कथा सांगतात. नवनव्या चरित्रात रंगायला शिकवतात. एक उत्तम कलाकार आणि सर्वोत्तम माणूस म्हणून जगायला शिकवतात’, असं तिने त्यात लिहिलंय.
व्हिडिओमध्ये रतनने असंही म्हटलं आहे की सध्या ती हे काम तिच्या जन्मभूमीवर करत आहे. लवकरच ती आपल्या कर्मभूमीत म्हणजेच महाराष्ट्रातही हेच काम करणार आहे. रतन महाराष्ट्रातील एका गावात राहिली आहे. तिथं तिने कांदा आणि हळदीची लागवडसुद्धा केली आहे. हा व्हिडीओ आणि फोटो पाहिल्यानंतर चाहतेही तिचं जोरदार कौतुक करत आहेत. अनेकांनी तिला पुन्हा मालिकेत पाहण्याची इच्छा व्यक्त केली. रतन राजपूतने कोविड-19 महामारी दरम्यान लॉकडाऊनचा बराच वेळ गावात घालवला होता. तिथे ती चुलीवर चपात्याही बनवताना दिसली. यावरून रतनने अभिनय सोडल्याचंही म्हटलं जात आहे.