मुंबई : चित्रपटांपासून टीव्हीपर्यंत आपली क्षमता सिद्ध करणारे अभिनेते अनुपम श्याम (Anupam Shyam) यांचे 8 ऑगस्ट रोजी मुंबईत निधन झाले. पण, आज आपण पुन्हा एकदा त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण त्यांची आठवण करत आहोत. अभिनेता अनुपम श्याम यांचे पूर्ण नाव अनुपम श्याम ओझा होते. अनेक सशक्त चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केल्यानंतर अनुपम यांना त्यांची खरी ओळख ‘मन की आवाज प्रतिज्ञा’ या मालिकेतून मिळाली होती.
‘मन की आवाज प्रतिज्ञा’ या मालिकेत अभिनेते अनुपम श्याम ‘ठाकूर सज्जन सिंह’ यांची भूमिका साकारत होते. ही भूमिका त्यांच्या कुटुंबासह प्रेक्षकांनाही खूप आवडली. अनुपम श्याम यांच्या या पात्रामध्ये सिंहासारखा अहंकार दिसायची, ज्याला पडद्यावर देखील सर्वजण वचकून असायचे.
अनुपम यांचा जन्म 20 सप्टेंबर 1957 रोजी उत्तर प्रदेशातील प्रतापगढ येथे झाला. लहानपणापासूनच त्यांना चित्रपटांमध्ये काम करण्याची आवड होती. अनुपमने अवध विद्यापीठातून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले आणि भारतेन्दू नाट्य अकादमीमधून अभिनयाचे शिक्षण घेतले. अनुपमच्या अभिनयामुळे आणि त्यांच्या दिसण्यामुळे, त्याला मुख्यतः गुंड आणि बदमाशांच्या भूमिका ऑफर केल्या गेल्या. अभिनेत्याने त्याच्या कारकिर्दीत ‘दस्त’, ‘लगान’, ‘नायक’, ‘शक्ती’, ‘पाप’, ‘जिज्ञासा’, ‘राज’ यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आणि त्यांच्या कामाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला.
2009 मध्ये, ‘मन की आवाज प्रतिज्ञा’ टीव्ही मालिका सुरू झाली. या मालिकेत त्यांनी ठाकूर सज्जन सिंहची भूमिका अशा प्रकारे साकारली की, ही मालिका टीआरपी चार्टच्या अव्वल जागेवर पोहोचली. या शोमध्ये अनुपमचे पात्र खूप नकारात्मक होते, पण प्रेक्षकांना ते देखील खूप आवडले. त्यानंतर प्रेक्षकांनी त्यांचे नाव ‘ठाकूर सज्जन सिंह’ असेच ठेवले.
अभिनय विश्वात येण्यापूर्वीच अनुपम श्याम ओझा यांचे लग्न झाले होते. अनुपम यांच्या पत्नीचे नाव सावित्री अनुपम ओझा आहे. अनुपमच्या आई-वडिलांना त्यांना डॉक्टर बनवायचे होते, पण त्यांच्यात अभिनयाचे वेड असे होते की, त्यांनी ठरवलेच होते की, पुढे आपल्याला अभिनेताच व्हायचे आहे.
अनुपम श्याम एक उत्तम अभिनेते होते, पण त्यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला होता. अनुपम गेल्या दोन वर्षभरापासून किडनीच्या आजाराने त्रस्त होते. त्यांच्या अनेक अवयवांनी पूर्णपणे काम करणे बंद केले होते. काही दिवसांपूर्वी किडनीशी संबंधित समस्येमुळे अनुपम यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. पण काही दिवसांपूर्वी तब्येतीत सुधारणा दिसल्याने त्यांना व्हेंटिलेटरवरून काढण्यात आले होते. मात्र, या उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.
Sonu Sood | कोट्यवधींच्या अफरातफरीचा आरोप, आता सोनू सूद म्हणतोय ‘कर भला, तो भला, अंत भले का भला’!