‘अनुपमा’ (Anupamaa) या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री रुपाली गांगुली (Rupali Ganguly) घराघरात लोकप्रिय आहे. गेल्या वर्षी सुरू झालेल्या या मालिकेने टीआरपीच्या यादीत सतत पहिलं स्थान पटकावलंय. या मालिकेत रुपाली अत्यंत साध्या, कुटुंबीयांसाठी त्याग करणाऱ्या गृहिणीची भूमिका साकारतेय. कथेनुसार तिच्या या भूमिकेत वेळोवेळी बदल होत गेले आणि अनुपमा ही चाहत्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय ठरली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रुपालीने तिच्या खऱ्या कुटुंबीयांविषयी सांगितलं. रुपालीचे वडील अनिल गांगुली हे चित्रपट दिग्दर्शक होते. अभिनेते धर्मेंद्रसोबत (Dharmendra) चित्रपट करताना त्यांना आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागलं आणि त्यामुळेच त्यांनी हक्काचं घरदेखील विकलं.
अनिल गांगुली यांनी 1991 मध्ये धर्मेंद्र यांच्यासोबत ‘दुश्मन देवता’ या चित्रपटासाठी काम केलं. यामध्ये डिंपल कपाडिय, आदित्य पांचोली, गुलशन ग्रोव्हर, श्रीराम लागू आणि सोनम यांच्याही भूमिका होत्या. दिवंगत संगीतकार बप्पी लहरी यांनी या चित्रपटाला संगीत दिलं होतं.
‘पिंकविला’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत रुपाली म्हणाली, “चित्रपट बनवण्यासाठी त्यावेळी लोक त्यांचे घर विकायचे. एखादा चित्रपट फ्लॉप ठरला, तरी ते घर विकायचे. असंच काहीचं आमच्यासोबतही घडलं. वडिलांनी धर्मेंद्र यांच्यासोबत चित्रपट केला. चित्रपट जलदगतीने बनवण्याचं कौशल्य वडिलांकडे होतं. मात्र या चित्रपटाला जवळपास तीन ते चार वर्षांचा कालावधी लागला. साहेब हा चित्रपट त्यांनी अवघ्या 40 दिवसांत बनवला होता. फिल्मसिटीमध्येच त्याचा सेट होता. शाळेच्या सुट्ट्यांदरम्यान आम्ही सेट पहायला जायचो. कधीकधी शॉट्समध्ये एक्स्ट्रा म्हणूनही आम्हाला उभं केलं जायचं. धर्मेंद्र यांच्या चित्रपटाला फार वेळ लागल्याने वडिलांना मोठा आर्थिक फटका बसला.”
“एखादी गोष्ट ज्या गतीने वर जाते, ती त्याच गतीने खालीसुद्धा येऊ शकते. माझ्या वडिलांनी खूप संघर्ष केला. कोलकाताहून ते पळून मुंबईला आले होते. राहायला घर नव्हतं म्हणून ते फूटपाथवर रात्र काढू लागले. एकेकाळी ते जगजित सिंग आणि इतर स्ट्रगलिंग कलाकारांसोबतही एका रुममध्ये राहिले होते. ते त्यांच्या आयुष्यात अनेक कठीण प्रसंगांना सामोरं गेले”, असं रुपालीने पुढे सांगितलं.
वडिलांनी दिग्दर्शित केलेल्या साहेब (1985), मेरा यार मेरा दुश्मन (1987), अंगारा (1997) या चित्रपटांमध्ये रुपालीने भूमिका साकारल्या. त्याचसोबत संजिवनी, साराभाई व्हर्सेस साराभाई, काव्यांजली, कहानी घर घर की, बा बहू और बेबी, आपकी अंतरा, अदालत यांसारख्या मालिकांमध्ये तिने दमदार काम केलं.
हेही वाचा:
Maha Minister: 11 लाखांच्या पैठणीवरून वाद; आदेश बांदेकरांना नेटकरी म्हणाले, “ही साडी नेसून..”
Ranbir Alia Wedding: रणबीर-आलियाच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू; पहा Video