झी मराठी वाहिनीवरील ‘रात्रीस खेळ चाले’ या लोकप्रिय मालिकेतील प्रत्येक भूमिकेने प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप सोडली. त्यातलीच एक भूमिका म्हणजे ‘शेवंता’ (Shevanta). अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने (Apurva Nemlekar) शेवंताची भूमिका साकारली. काही कारणास्तव ही मालिका सोडल्यानंतर ती ‘तुझं माझं जमतंय’ या मालिकेत पम्मीच्या भूमिकेत झळकली. तिच्या या भूमिकेवरही प्रेक्षकांनी कौतुकाचा वर्षाव केला. त्यानंतर ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकेत ती राणी चेन्नम्माच्या भूमिकेत दिसली. अपूर्वाच्या या विविध भूमिकांना प्रेक्षकांकडून नेहमीच चांगला प्रतिसाद मिळाला. सोशल मीडियावरही तिचा मोठा चाहतावर्ग आहे. इन्स्टाग्राम या ॲपवर ती बऱ्यापैकी सक्रिय असून आपले विविध फोटो आणि व्हिडीओ ती नेटकऱ्यांसोबत शेअर करते. नुकतंच तिने ‘आस्क मी एनिथिंग’ (Ask Me Anything) या इन्स्टाग्रामवरील सेशनद्वारे चाहत्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरं दिली.
यावेळी अपूर्वाला नेटकऱ्यांनी विविध प्रश्न विचारले. या प्रश्नांची उत्तरं तिने मनमोकळेपणाने दिली. एका चाहत्याने अपूर्वाला तिच्या रिलेशनशिप स्टेटसवरूनही प्रश्न विचारला. ‘तुम्ही सिंगल आहात की लग्न झालंय’, असा प्रश्न एकाने विचारला असता तिने उत्तर दिलं, ‘हॅपिली सिंगल आहे पण मी माझ्या Soulmate ची वाट बघतेय’.
22 फेब्रुवारी 2016 पासून चालू झालेल्या ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेने नुसता धुमाकूळ घातला होता. तळकोकणातल्या एका वाड्यातला नाईकांचा एक कुटुंब अस्सल मालवणी भाषेत प्रेक्षकांच्या समोर आलं होतं. अण्णा नाईकांच्या कुटुंबाची कथा सुरुवातीपासूनच गाजत होती. अण्णा, अण्णाची बायको, माधव, दत्ता, नीलिमा, सरिता, छाया आणि अभिराम ही पात्रं तर लोकप्रिय झाली, पण त्यापेक्षाही वरचढ ठरले पांडू, सुशल्या आणि शेवंता! सुरुवातीला कोकणची बदनामी होते म्हणून मालिकेला विरोध झाला. पण जसजसं कथानक पुढे सरकत गेलं, तसतसा हा विरोधही मावळत गेला.