मुंबई : ‘बिग बॉस मराठी सिझन 2’ (Bigg Boss Marathi Season 2) चा विजेता शिव ठाकरे (Shiv Thakare) एका भीषण कार अपघातातून बालंबाल बचावला आहे. शिव आपल्या कुटुंबीयांसह अमरावतीवरुन प्रवास करत होता. यावेळी वळगाव भागात त्याच्या गाडीला एका टेम्पो ट्रॅव्हलरने मागून धडक दिली. या अपघातात शिवसह त्याचे कुटुंबीय थोडक्यात बचावले असून शिवच्या चेहऱ्याला दुखापत झाल्याची माहिती आहे.
नेमकं काय घडलं?
अमरावतीहून अचलपूरच्या दिशेने जाणाऱ्या शिव ठाकरेच्या कारला वळगाव जवळ एका टेम्पो ट्रॅव्हलरने जोरदार धडक दिली. या धडकेत शिवची कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतात उलटली. या अपघातात शिवसोबत असलेल्या त्याच्या आई आणि बहिणीलाही दुखापत झाल्याची माहिती आहे. शिवच्या कारचेही अपघातात नुकसान झाले आहे. अपघातावेळी गाडी नेमकं कोण चालवत होतं, याविषयी माहिती नाही. तसंच अपघात करणाऱ्या टेम्पो चालकावर काय कारवाई झाली, याबाबतही अद्याप स्पष्टता नाही.
शिव ठाकरेला झालेल्या दुखापतीचे फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. शिव आणि त्याच्या कुटुंबीयांसाठी प्रार्थना करण्याचं आवाहन त्याचे चाहते करत आहेत.
कोण आहे शिव ठाकरे
शिव ठाकरे हा ‘बिग बॉस मराठी सिझन 2’चा विजेता ठरला होता. शिव मूळ विदर्भातील अमरावतीचा रहिवासी आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या ‘बिग बॉस मराठी 2 च्या पर्वात शिव सुरुवातीपासूनच त्याच्या रांगड्या बाजामुळे चर्चेत होता. अभिनेत्री वीणा जगतापसोबत त्याची जोडी ‘बिग बॉस’च्या घरात गाजली होती. अनेक टास्क परफॉर्म करुन त्याने प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं होतं. अभिनेत्री नेहा शितोळेला हरवून त्याने विजेतेपदाची ट्रॉफी उंचावली होती. सोबतच 17 लाख रुपयांचे बक्षीसही मिळवले होते. शिवने या आधी रोडीज् या हिंदी रिअॅलिटी शोमध्येही चमकदार कामगिरी केली होती.
संबंधित बातम्या :
मराठी चित्रपटसृष्टीतील जेष्ठ अभिनेत्री माधवी गोगटे यांचे निधन