मुंबई : ‘बिग बॉस मराठी 3’चा (Bigg Boss Marathi 3) हा मनोरंजक प्रवास संपायला आता अवघा एक दिवस उरला आहे. 100 दिवसांच्या या खेळात मनोरंजन विश्वातील 15 कलाकारांनी सहभाग घेतला होता. ‘बिग बॉस मराठी सीझन 3’ आता त्याच्या ग्रँड फिनालेसाठी सज्ज आहे. सध्या अंतिम टप्प्यात असलेला हा शो काही तासांतच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. 19 सप्टेंबरपासून सुरू झालेला 100 दिवसांचा प्रवास अखेर रविवारी संपणार आहे. फक्त 5 स्पर्धक आतापर्यंत या शर्यतीत टिकून राहू शकले आहेत.
याआधी, असे वृत्त आले होते की महेश मांजरेकर त्यांच्या तब्येतीच्या समस्येमुळे शो मध्येच सोडणार आहेत, परंतु त्यांनी या अफवा फेटाळून लावल्या. महेश मांजरेकर म्हणाले की, माझी तब्येत ठीक आहे. स्पर्धक देखील छान खेळत आहेततो आणि ग्रँड फिनालेचेही सूत्रसंचालन मीच करणार आहे.
‘बिग बॉस मराठी’च्या इतिहासात प्रथमच, शेवटच्या आठवड्यात मिड-वीक इव्हिक्शन पार पडले आहे. विशाल निकमने ‘तिकीट टू फिनाले’ जिंकून थेट अंतिम फेरी गाठली आहे. पाच स्पर्धक विकास पाटील, उत्कर्ष शिंदे, मीरा जगन्नाथ, जय दुधाणे आणि मीनल शहा, यांना या एलिमिनेशनसाठी नामांकन देण्यात आले होते, आणि त्यातून मीरा जगन्नाथ घराबाहेर झाली आहे. त्यामुळे आता या शेवटच्या टप्प्यात केवळ 5 स्पर्धक अंतिम झुंज देताना दिसणार आहेत.
‘बिग बॉस मराठी 3’चा ग्रँड फिनाले रविवारी अर्थात 26 डिसेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजता सुरू होणार आहे आणि या सोहळ्याच्या शेवटी ‘बिग बॉस मराठी 3’ सीझनच्या विजेत्याला ट्रॉफी आणि बक्षीस देण्यात येणार आहे. हा सोहळा ‘कलर्स मराठी’ वाहिनी आणि ‘वूट’वर पाहता येणार आहे.
विजेत्याची बक्षीस रक्कम आधी 25 लाख होती, पण आता ती 20 लाखांवर आणली गेली आहे. अलीकडील टास्कमध्ये, बिग बॉसने ‘टॉप 7’ घरातील सदस्यांना 25 लाखांची बक्षीस रक्कम आपापसात वाटून घेण्यास सांगितले. त्यांनी सात स्पर्धकांसाठी सात प्लेट्स दिल्या आणि प्रत्येक प्लेटवर काही रक्कम नमूद केली होती. प्लेट्समध्ये रु. 12,50,000, रु. 6,00,000, रु. 3,25,000, रु. 1,50.000 रु. 1,00,000, रु. 50,000, रु., 25000 असे त्यावर लिहिले होते.
‘बिग बॉस’ने असेही घोषित केले होते की, जर एखाद्या स्पर्धकाला घराबाहेर काढण्यासाठी नामांकन मिळाले, तर त्याला/तिला नियुक्त केलेली रक्कम अंतिम बक्षीस रकमेतून वजा केली जाईल. या टास्कमध्ये मीराला नॉमिनेट केले गेले आणि बक्षिसाच्या रकमेतून तिला देण्यात आलेल्या पाटीवरचे 25000 रुपये कमी झाले. त्यानंतर अनुक्रमे सोनाली पाटील 50 हजार, उत्कर्ष शिंदे 1,00,000, विकास पाटील 3,25,000 नॉमिनेट झाल्याने ही रक्कम बक्षिसाच्या रकमेतून कमी करण्यात आली. अखेरीस एकूण अंतिम बक्षीस रकमेतून 5,00,000 रुपये कमी झाले.