मुंबई : बहुचर्चित ‘बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss Marathi 3) तिसऱ्या पर्वाचा ग्रँड प्रिमिअर 19 सप्टेंबर रोजी संध्याकाळी सात वाजता पार पडला आहे. आपल्या खास शैलीत ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील सदस्यांची शाळा घेणारे दिग्गज अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकरच यंदाही सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसत आहेत. ‘कलर्स मराठी’वरील या धमाकेदार रिअॅलिटी शोचे शानदार प्रोमो प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतले होते. आता या कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे.
युवा कीर्तनकार शिवलीला बाळासाहेब पाटीलने (Shivlila Patil) देखील या घरात एण्ट्री केली आहे. आपल्या कीर्तनाने श्रोत्यांचे कान तृप्त करणारी शिवलीलाचे ‘बिग बॉस मराठी’च्या घरात येणे रुचलेले नाहीये. सोशल मीडियाद्वारे अनेक चाहत्यांनी कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
शिवलीलाच्या एका श्रोत्याने कमेंट करत म्हंटले की, ‘ताई, मला वाटतं हा तुमचा निर्णय चुकीचा ठरेल.’ तर, दुसऱ्याने म्हटले की, ‘खर तर यांना बिग बॉसच्या घरात यायची गरज नव्हतीच. शिवलीलाताई तुम्ही कीर्तनकार आहात तुमची समाजाला गरज आहे बिग बॉसला नाही’. ‘त्या घरात काही अध्यात्मिक सत्वगुणी वातावरण नसतं. त्या घरात तमोगुणी वातावरण असतं. तिथं जेवणाचं काय..? मांस आणि अंडी त्याच किचन मध्ये बनतं जिथं शाकाहारी भोजन बनतं. आपण एका शुद्ध वारकरी संप्रदायाचे नेतृत्व करतोय याचं भान असू द्या. अध्यात्मिक पतन खूप महागात पडतं. ज्या प्रमाणे श्रीमद भागवत मध्ये महाराज नहूस यांचं पतन झालं तसं तुमचं पण अध्यात्मिक पतन होईल. नाहूस महाराज धर्मराज युधिष्ठिर महाराजांना व्यक्तीचे पतन होण्याची कारणे सांगतात. नाहूस महाराज म्हणतात “पद, प्रतिष्ठा, प्रसिद्धी, पैसा” या चार गोष्टी मुळे व्यक्ती चे पतन होते. अजून वेळ गेली नाही योग्य निर्णय घ्या.’, असे देखील एका चाहत्याने म्हटले आहे.
एकीकडे शिवलीला ‘बिग बॉस’मध्ये आल्यामुळे बोल लगावले आहेत, तर दुसरीकडे काही श्रोत्यांनी तिला पाठींबा देखील दिला आहे. ‘बिग बॉस ने शिवलीला ताई ला बिग बॉस च्या घरात आणून खूप मोठ काम केलं आहे …. शिवलीला ताई तुला खूप खूप शुभेच्छा… आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत. जय जय राम कृष्ण हरी…. विठू माउली तुम्हाला यश देवो’, असे म्हटले आहे.
युवा कीर्तनकार शिवलीला सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. तिचे कीर्तनाचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. शिवलीला वयाच्या 5व्या वर्षापासून कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं काम करते. ग्रामीण भाषा आणि प्रमाण मराठी भाषेतून अगदी विनोदी पद्धतीनं ती कीर्तन करते. तिची ही खास आणि हटके स्टाईल चाहत्यांच्या चांगलीच पसंतीस उतरते. तिच्या मोठा चाहता वर्ग आहे.
शिवलीलाचे वडील बाळासाहेब पाटील हे सुद्धा मोठे कीर्तनकार आहेत. वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत शिवलीलानं ग्रामीण आणि शहरी भागात स्वतःचा वेगळा चाहता वर्ग बनवला होता. एवढंच नाही तर तिनं महाविद्यालयीन शिक्षणही घेतलं आहे. मात्र महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच तिनं आपली कीर्तनाची आवड जोपासली त्याला खंड पडू दिला नाही. कौटुंबिक जीवनातील आगळे वेगळे प्रसंग, समाजातील काही खास गोष्टी, मधेच विनोद करत ती कीर्तन करते. त्यामुळे तिनं स्वतःची एक स्टाईल निर्माण केली आहे. ही स्टाईल प्रेक्षकांच्या मनाला भिडणारी आहे.
महत्त्वाचं म्हणजे तिनं आतापर्यंत 10 हजारांहून अधिक कीर्तनं केली आहेत आणि सहाजिकच तिनं घरात प्रवेश करताना सुद्धा हटके निरुपन करत प्रवेश केला. त्यामुळे आता ही युवा कीर्तनकार बिग बॉसच्या या घरात स्वत:ची वेगळी जागा कशी निर्माण करेल याकडे सर्वांचं लक्ष आहे.
Drug Case | ड्रग्ज प्रकरणी अभिनेता गौरव दीक्षितला जामीन मंजूर, पासपोर्ट न्यायालयात जमा करावा लागणार!
Amruta Khanvilkar : ‘सूर निरागस हो’ म्हणत अमृता आणि मृण्मयीनं धरला ठेका, पाहा खास व्हिडीओ