झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवरील ‘देवमाणूस 2’ (Devmanus 2) या मालिकेने प्रेक्षकांना टीव्ही स्क्रीनवर खिळवून ठेवलं आहे. या पर्वात अजितला कोणाचाच धाक नाही असं वाटतं असतानाच मालिकेत मार्तंड जामकर नावाच्या पोलीस अधिकाऱ्याची एण्ट्री झाली. या एण्ट्रीने कथानकात एक नवीन ट्विस्ट पाहायला मिळाला. ही भूमिका अभिनेता मिलिंद शिंदे (Milind Shinde) अगदी चोख साकारत आहेत. मार्तंड जामकर यांच्या एण्ट्रीनंतर मालिका अतिशय रंजक वळणावर आली आहे. मार्तंड अजितकुमारला कसा धडा शिकवणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. आपल्या उत्तम अभिनय कौशल्याने मिलिंद शिंदे यांनी आपल्या प्रत्येक भूमिकेची छाप प्रेक्षकांच्या मनावर पाडली आहे. मार्तंड जामकरमुळे अजितकुमारसमोर कुठलं नवीन आव्हान उभं राहणार, अजितकुमारचा चांगुलपणाचा मुखवटा फाडून त्याचा खरा चेहरा गावकऱ्यांसमोर येईल का हे प्रेक्षकांना लवकरच मालिकेत पाहायला मिळेल.
आपल्या या वेगळ्या आणि दमदार भूमिकेबद्दल मिलिंद शिंदे म्हणाले, “मी एका चांगल्या भूमिकेची वाट बघत होतो. अनेकदा खलनायक साकारल्यानंतर एक दमदार अशी भूमिका मार्तंड जामकरच्या रूपात माझ्या वाट्याला आली. एक इमानदार पोलीस अधिकारी ज्याच्यावर त्याच्या वरिष्ठांचा विश्वास आहे आणि तो कुठलीही केस तडीस नेतो अशी भूमिका मला देवमाणूस 2 या लोकप्रिय मालिकेत साकारायला मिळाली याचा मला आनंद आहे.”
ही भूमिका मिलिंद शिंदे यांच्यासाठी खास का आहे याचं कारण सांगताना ते म्हणाले, “माझी आधी इच्छा होती की मी आयएएस किंवा आयपीएस अधिकारी व्हावं. जर मी अभिनेता नसतो झालो तर मी कदाचित आयएएस किंवा आयपीएस अधिकारी झालो असतो आणि तो अधिकारी हा मार्तंडसारखाच असता. मार्तंड जामकर प्रमाणेच इमानदार, तत्वांशी बांधील असणारा, गुन्हेगारांना अद्दल घडवणारा असाच अधिकारी मी झालो असतो.”