स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेत अनिरुद्धची भूमिका साकारणारे अभिनेते मिलिंद गवळी (Milind Gawali) यांनी सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. मालिकेच्या सेटवर त्यांचे वडील श्रीराम गवळी, ‘अनुपमा’ या मालिकेतील अभिनेते अरविंद वैद्य आणि अनिरुद्धच्या वडिलांची भूमिका साकारणारे किशोर महाबोले यांची एकत्र भेट झाली. या भेटीदरम्यानचा व्हिडीओ त्यांनी पोस्ट केला असून त्याबाबत एक भलीमोठी पोस्टसुद्धा त्यांनी लिहिली आहे. मिलिंद गवळी यांचे वडील पोलीस खात्यात कामाला होते. मात्र त्यांनी मुलाला कशाप्रकारे कलाविश्वात जाण्यास प्रोत्साहन दिलं, याविषयी त्यांनी या पोस्टमध्ये लिहिलं आहे.
‘ग्रेट भेट. काल ‘आई कुठे काय करते’च्या सेटवर माझे वडील श्रीराम गवळी आले होते. त्यांच्याबरोबर अरविंद वैद्य जे ‘अनुपमा’ या सिरीयलमध्ये वडिलांचे काम करतात ते पण आले होते आणि सेटवर त्यांची भेट किशोरजी महाबोलेंशी झाली, जे अनिरुद्धच्या वडिलांचे काम करतात. या तिघांची जी भेट झाली आणि मला असं वाटलं, ही आहे ग्रेट भेट. तिघंही अतिशय तरुण, उत्साही आणि हुशार अनूभवी. माझ्यासाठी हा कालचा दिवस खूप आनंददायी आणि छान गेला. खूप गप्पा झाल्या, जेवणं झाली, परत चहा झाले, सहकलाकार यांच्या भेटी झाल्या. अरविंदजींना संजनाचं कॅरेक्टर खूप आवडतं, त्यामुळे त्यांच्या तिच्याशी (रुपाली भोसले) खूप गप्पा झाल्या आणि तिला भरभरून त्यांनी आशीर्वाद दिले. शंतनु मोघेचे वडील श्रीकांतजी मोघे हे अरविंदजींचे मित्र होते, त्यामुळे शांतनुची भेट झाली. त्याला त्यांनी आशीर्वाद दिले. सुलभा देशपांडे यांची आठवण काढली आणि त्यांचा चिरंजीव निनाद देशपांडे तोही काल शूटिंग करत होता, त्याची भेट झाली. मग अश्विनी महांगडे, गौरी कुलकर्णी, अभिषेक देशमुख, निरंजन कुलकर्णी सगळ्यांशी छान गप्पा झाल्या.’
‘काल मला तो दिवस आठवला.. तीस-पस्तीस वर्षांपूर्वी माझा हात धरून गोविंद सरया यांच्या चित्रपटाच्या सेटवर माझे वडील मला घेऊन गेले होते. सिनेमाचं नाव होतं ‘वक्त से पहले’. खूप घाबरलो होतो. अॅक्टिंग, सिनेमा काय असतं काहीच माहिती नव्हतं. माझ्या वडिलांनी त्यांचं पोलिस खातं… जिथे खूप खडतर प्रवास आहे त्या मार्गावर मला न पाठवता या चंदेरी दुनियेचा मार्ग त्यांनी मला दाखवला. वेगळंच विश्व होतं, या विश्वाची त्यांनाही कल्पना नव्हती. पण पोलिस खात्यापेक्षा नक्कीच चांगलं जग असेल याची त्यांना खात्री होती. माझी आवड बघून त्यांनी मला साथ दिली. मला ते नेहमी म्हणत आलेले आहेत ‘काळजी करू नकोस मी आहे’ आणि खरंच ते आहेत म्हणून मी आहे, होतो आणि राहणार. माझे पप्पा आणि अरविंदजी 80 प्लस आहेत पण कुठल्याही तरुण मुलाला लाजवतील इतका उत्साह त्यांच्यात आहे,’ असं त्यांनी या पोस्टमध्ये लिहिलंय.
मिलिंद यांच्या या पोस्टवर संजनाची भूमिका साकारणारी अभिनेत्री रुपाली भोसलेनंही कमेंट केली आहे. ‘खरंच ग्रेट भेट. अनुभवांचा, आठवणींचा साठा होता. कमालीची गोष्ट म्हणजे प्रत्येक वयोगटाशी ते त्याच पद्धतीने बोलत होते… अत्यंत उत्साहपूर्ण, सकारात्मक आणि प्रेमळ. आम्हाला तुमच्या फॅमिलीचा भाग बनवण्यासाठी थँक्यू,’ असं तिने लिहिलं.