स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) ही सध्या छोट्या पडद्यावरील सर्वांत लोकप्रिय मालिका आहे. अरुंधती (Arundhati), अनिरुद्ध, संजना, अनघा, कांचन देशमुख या मालिकेतील प्रत्येक भूमिकेने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे. मालिकेच्या कथानकात येणारे रंजक वळण, कलाकारांचं अभिनय यांसोबतच व्यक्तिरेखांच्या तोंडी असलेले संवाद ही मालिकेच्या लोकप्रियतेमागील काही खास कारणं आहेत. मुग्धा गोडबोले (Mugdha Godbole) या मालिकेचं संवादलेखन करतात. अरुंधती ही व्यक्तीरेखा जरी मालिकेच्या केंद्रस्थानी असली तरी तिच्यासमोर इतर व्यक्तीरेखा फिक्या पडू नयेत, याची विशेष काळजी मालिकेच्या टीमकडून घेतली जाते. या मालिकेचे संवाद लिहिण्यामागे काय विचार असतात, कोणती काळजी घेतली जाते, याविषयी खुद्द मुग्धा गोडबोले या ‘टीव्ही 9 मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त झाल्या आहेत.
मालिकेच्या पहिल्या दिवसापासून घेतली ‘ही’ काळजी
“पहिल्या दिवसापासून आम्ही एकच काळजी घेतली ती म्हणजे यातला प्रत्येक कॅरेक्टरची भूमिका स्पष्ट असली पाहिजे. ती प्रेक्षकांच्या दृष्टीने कन्विन्सिंग असली पाहिजे. जेव्हा अनिरुद्ध आणि अरुंधती यांच्यामधला संवाद होतो, तेव्हा दोघांचे सीन्स हे त्यांच्या त्यांच्या पद्धतीने अत्यंत स्पष्ट असले पाहिजेत. पण आपल्याला अरुंधतीचं मत जास्त पटलं पाहिजे. ही त्यातली कसरत आहे. बऱ्याचदा हिरोईनला मोठं करायचं असेल तर इतर भूमिकांना मूर्ख ठरवलं जातं. तो सोपा मार्ग आहे. पण या मालिकेच्या बाबतीत आम्ही असं करत नाही. संजना असेल, अनिरुद्ध असेल, अरुंधतीची सासू असेल.. त्यांची वैचारिक जडणघडणसुद्धा प्रेक्षकांपर्यंत पोहोचावी, असा आमचा प्रयत्न आहे. मग प्रेक्षकांना ठरवू दे की त्यांना यातलं काय बरोबर वाटतंय. त्याच्यामुळे अरुंधती ही व्यक्ती म्हणून किंवा व्यक्तीरेखा म्हणून कोणाला ओव्हरपॉवर करत नाही. बाकी सगळे सुद्धा आपापल्या जागी क्लिअर असतात. म्हणूनच जेव्हा अनिरुद्ध किंवा संजना त्यांचा स्टँड मांडतात, त्या त्या वेळी तेसुद्धा बरोबर वाटतात. फेमिनिस्म म्हणजे बायकांनी भांडणं किंवा पुरुषांना ओव्हरपॉवर करणं नाही, मी त्याचा अर्थ असा काढते की सारासर विचार करून योग्य तो निर्णय घेण्याची मुभा असणं, ते स्वातंत्र्य असणं,” असं त्या म्हणाल्या.
या मालिकेच्या एका एपिसोडचं संवादलेखन करण्यासाठी त्यांना पाच ते सहा तासांचा कालावधी लागतो. 23 मिनिटांच्या एपिसोडमधील पात्रं, त्यांची जागा, पात्रांची वयं, त्यांची मनस्थिती, आधी झालेले सीन्स, नंतर झालेले सीन्स या सगळ्यांचा विचार करून संवाद लिहावे लागतात, असं त्या सांगतात.
हेही वाचा:
लेखक नशा करून, गांजा मारून लिहितात का? ट्रोलिंगवर ‘आई कुठे काय करते’च्या लेखिकेचा परखड सवाल
आई कुठे काय करते: देशमुखांसमोर आशुतोष देणार प्रेमाची कबुली; काय असेल अरुंधतीची प्रतिक्रिया?