मुंबई- ‘इंडियन आयडॉल’चा तेरावा सिझन (Indian Idol 13) सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. शोच्या 13 व्या सिझनसाठी ऑडिशन्स सुरू आहेत आणि त्याचदरम्यान सोशल मीडियावर बॉयकॉटची (Boycott Trend) मागणी केली जातेय. इंडियन आयडॉल हा शो स्क्रिप्टेड आहे, असा आरोप अनेकदा केला जातो. आता या शोसंदर्भात नवा वाद समोर आला आहे. हा नेमका वाद काय आहे आणि शोवर बहिष्काराची मागणी का केली जातेय, ते जाणून घेऊयात..
इंडियन आयडॉल 13 ची अंतिम यादी समोर आली आहे. यामध्ये 15 स्पर्धकांचा समावेश आहे. सोनाक्षी कर, नवदीप वडाली, प्रीतम रॉय, देबोस्मिता रॉय, सेंजुती दास, चिराग कोटवाल, संचारी सेनगुप्ता, काव्या लिमाए, ऋषी सिंह, शिवम सिंह, बिदिप्ता चक्रवर्ती, अनुष्का पत्र, रुपम भरनारहिया, शगुन पाठक आणि विनीत सिंह यांचा त्यात समावेश आहे. या अंतिम 15 स्पर्धकांमध्ये रीतो रीबाचं नाव नसल्याने चाहते नाराज झाले आहेत. त्यामुळेच या शोवर बहिष्काराची मागणी केली जातेय.
ऑडिशनच्या सर्व फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर या 15 स्पर्धकांची अंतिम यादी तयार करण्यात आली आहे. या यादीवर परीक्षक नेहा कक्कर, विशाल दादलानी आणि हिमेश रेशमियाँ यांनी शिक्कामोर्तब केला. त्याचसोबत कलर्स टीव्हीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर ही यादी पोस्ट करण्यात आली. या यादीत रीतो रीबाचं नाव नसल्याने चाहते नाराज झाले आहेत.
सोशल मीडियावर नेटकरी या शोविरोधात राग व्यक्त करत आहेत. रीतोला पुन्हा शोमध्ये आणण्याची मागणी नेटकरी करत आहेत. अंतिम 15 स्पर्धकांमध्ये समाविष्ट होण्यासाठी लागणारी कला रीतोमध्ये असतानाही त्याला का नाकारण्यात आलं, असा सवाल नेटकरी करत आहेत.
रीतो हा अरुणाचल प्रदेशचा राहणारा आहे. उत्तम गायक असण्यासोबतच तो संगीतकारसुद्धा आहे. रीतोचा स्वत:चा युट्यूब चॅनलसुद्धा आहे. सोशल मीडियावर त्याचा चांगला फॅन फॉलोईंग आहे. ऑडिशनदरम्यान परीक्षक हिमेश रेशमियाँने रीतोला स्वत:चं गाणं गाण्यास सांगितलं. तेव्हा रीतोने स्वत: संगीतबद्ध केलेलं गाणं गाऊन दाखवलं. त्याचं हे गाणं प्रेक्षकांनाही खूप आवडलं होतं.