सोनी मराठी वाहिनीवर येत्या 18 जुलैपासून प्रेक्षकांना एक नवीकोरी प्रेमकहाणी बघायला मिळणार आहे. ‘जिवाची होतिया काहिली’ (Jivachi Hotiya Kahili) ही मराठी आणि कानडी यांच्या प्रेमाची कहाणी छोट्या पडद्यावर दिसणार आहे. या मालिकेत प्रमुख नायकाच्या भूमिकेत प्रेक्षकांचा लाडका, कोल्हापूरचा रांगडा गडी अभिनेता राज हंचनाळे (Raj Hanchanale) तर नायिका म्हणून प्रतीक्षा शिवणकर (Pratiksha Shiwankar) दिसणार आहे. या दोघांची प्रमुख कलाकार म्हणून ही पहिलीच मालिका आहे. ‘जिवाची होतिया काहिली’ असं मालिकेचं नाव असून मराठी आणि कानडी भाषांचा मिलाप यात होणार आहे. राज अस्सल कोल्हापुरी मुलाची तर प्रतीक्षा कानडी मुलीची भूमिका साकारणार आहे.
या मालिकेचे काही प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले होते. या प्रोमोमधील मालिकेची झलक प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. प्रेमाला भाषा नसते, हे त्यातून दिसलं. मालिकेतील मुख्य कलाकारांबरोबरच आकर्षण ठरले आहेत ते म्हणजे नायक-नायिकेच्या वडिलांची भूमिका साकारणारे दोन अनुभवी कलाकार. अर्थातच विद्याधर जोशी आणि अतुल काळे. हे दोन्ही दिग्गज कलाकार एका नव्या भूमिकेत, नव्या वेशात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. विद्याधर जोशी हे अस्सल कोल्हापुरी वेशात तर अतुल काळे यांचा कर्नाटकी पोशाख प्रेक्षकांना आवडतो आहे. कन्नड आणि मराठी कुटुंबं एकाच घरात, एकाच छताखाली कसे राहणार, हा चर्चेचा विषय ठरला आहे आणि त्यातही त्यांच्यात होणारं भांडण आणि घरातल्या घरातच मारली जाणारी सीमारेषा प्रेक्षकांना आवक् करते आहे.
कोल्हापुरी भाषेवरचा कानडी तडका, प्रतीक्षाने साकारलेली कर्नाटकी मुलगी, विद्याधर जोशी आणि अतुल काळे या जोडगोळीचं ऑनस्क्रीन भांडण आणि भाषेपलीकडचं प्रेम हे सर्व प्रेक्षकांना मालिकेत पहायला मिळेल. येत्या 18 जुलैपासून सोनी मराठी वाहिनीवर ‘जिवाची होतिया काहिली’ ही मालिका सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7.30 वाजता प्रसारित होणार आहे.