दिग्दर्शक रोहित शेट्टी सूत्रसंचालन करत असलेल्या ‘खतरों के खिलाडी’च्या (Khatron Ke Khiladi 12) बाराव्या सिझनची शूटिंग सध्या दक्षिण आफ्रिकेतल्या केपटाऊन याठिकाणी होत आहे. यंदाच्या सिझनमध्ये इतर सेलिब्रिटींसह टेलिव्हिजन अभिनेत्री कनिका मान (Kanika Mann) हिनेसुद्धा भाग घेतला आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटवर ती दक्षिण आफ्रिकेतील शूटिंगदरम्यानचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करतेय. मात्र हे करताना तिने तिच्या वडिलांना इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ब्लॉक केलंय. स्विमसूटमधील (swimsuit) फोटो अपलोड करण्यासाठी वडिलांना ब्लॉक केल्याचं कनिकाने सांगितलं. ‘खतरों के खिलाडी 12’मध्ये कनिकासोबतच रुबिना दिलैक, फैजल शेख, जन्नत झुबैर, मोहित मलिक, चेतना पांडे, निशांत भट, प्रतिक सेहजपाल, सुरभी झा आणि शिवांगी जोशी यांनीसुद्धा भाग घेतला आहे.
‘ई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत कनिका म्हणाली, “मी माझ्या बहिणीला ब्लॉक केलं नव्हतं. तिला माझे इन्स्टाग्रामवरील फोटो दिसत होते आणि तेव्हा वडिलांनी तिला विचारलं की मला कनिकाचे फोटो का दिसत नाहीत? माझ्या बहिणीने त्यांना कसंबसं समजावलं की ती फारसे फोटो अपलोड करत नाहीये. तरीसुद्धा ते तिला विचारत होते की त्यांना माझ्या अकाऊंटवरील फोटो का दिसत नव्हते. त्यांना इन्स्टाग्रामच्या फिचर्सबद्दल फारशी माहिती नाही. आता शो काही दिवसांत ऑन एअर जाईल. तेव्हा मी त्यांचा सामना कसा करेन हे मलाच माहित नाही.”
काही दिवसांपूर्वीच कनिकाचा ‘खतरों के खिलाडी’च्या सेटवरून एक फोटो व्हायरल झाला होता. यामध्ये तिच्या शरीरावर विविध जखमा झाल्याचं पहायला मिळालं होतं. शोमध्ये स्टंट करताना कनिकाला बरीच दुखापत झाली होती. याच दुखापतीचा फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केला होता. “होय, मला दुखापत झाली आहे. माझ्या हात आणि पायाला बरंच लागलंय. याबद्दल मी रोहित शेट्टी सरांना पण सांगितलं होतं. पण ते म्हणाले की आपल्या प्रेक्षकांना हे माहित नाही. तू स्ट्राँग खेळाडू आहेस म्हणून यात भाग घेतलास असं लोकांना वाटतं. तू स्ट्राँग आहेस हे सिद्ध करून दाखव. त्यामुळे स्टंट करताना थोडीफार दुखापत झाली तर तो या शोचा एक भागच आहे असं आम्ही समजतो”, असं ती त्यावेळी म्हणाली होती.
‘खतरों के खिलाडी’च्या याआधीच्या सिझनमध्येही बरेच कलाकार दुखापतग्रस्त झाले होते. तेजस्वी प्रकाशच्या डोळ्याला दुखापत झाल्यानंतर तिला तो शो मध्येच सोडावा लागला होता. पायाला जखम झाल्याने भारती सिंगलाही शोमधून बाहेर पडावं लागलं होतं. नंतर तिची जागा तिच्या पतीने घेतली होती.