मुंबई : बॉलिवूडचे ‘महानायक’ अमिताभ बच्चन होस्ट करत असलेल्या ‘कौन बनेगा करोडपती 13’ या आयकॉनिक शोला त्यांची पहिली करोडपती मिळाली आहे. आग्राच्या हिमानी बुंदेला (Himani Bundela) ‘कौन बनेगा करोडपती 13’च्या पहिल्या कोट्याधीश बनल्या आहेत. हिमानी यांच्या या यशाचे विशेष कौतुक म्हणजे दृष्टिहीन असूनही या खेळत सहभागी झाल्या होत्या.
हिमानी बुंदेला यांना 7 कोटी रुपये जिंकण्याची संधी देखील देण्यात आली होती. परंतु, त्या डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्यासंबंधी विचारल्या गेलेल्या बोनस प्रश्नाचे उत्तर देऊ शकल्या नाहीत. मात्र, या हंगामातील पहिल्या करोडपती बनल्याबद्दल त्यांची सर्वत्र चर्चा होत आहे. चला तर मग, कौन बनेगा करोडपतीच्या 13व्या पर्वाच्या पहिल्या करोडपती ठरलेल्या हिमानी बुंदेला यांच्याबद्दल जाणून घेऊ…
हिमानी बुंदेला या 25 वर्षीय नेत्रहीन महिला आहेत. त्या मूळच्या आग्रा शहरातील आहेत. लोकप्रिय क्विझ शोमध्ये अर्थात KBC मधील त्यांच्या अविश्वसनीय विजयानंतर, हिमानी बुंदेला यांनी जोश टॉक्सवर आपली कहाणी शेअर केली. हिमानी यांनी सांगितले की, त्यांनी वयाच्या 9व्या वर्षी केबीसी हा शो बघायला सुरुवात केली आणि तेव्हापासून अमिताभ बच्चन यांना भेटण्याचे त्यांचे स्वप्न होते.
25 वर्षीय हिमानी यांनी त्या घटनेबद्दलही सांगितले, ज्यामुळे त्यांना वयाच्या 15व्या वर्षी अंधत्व आले. जोश टॉक्सने त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये हिमानी म्हणाल्या की, ‘एक दिवस जेव्हा मी कोचिंग क्लासला जात होतो, तेव्हा माझा अपघात झाला. मला शारीरिक इजा झाली होती, पण त्याचा माझ्या डोळ्यांवरही परिणाम झाला. जेव्हा मी डॉक्टरांकडे गेलो, तेव्हा त्यांनी माझ्या कुटुंबाला सांगितले की, मी माझा रेटिना वेगळा झाला आहे. माझ्या अंधःकारमय आयुष्यातील पहिले 6 महिने भयंकर होते. त्यावेळी माझे संपूर्ण कुटुंब शोकात होते.’
हिमानी बुंदेला म्हणतात की, त्यांचे पहिले आव्हान 12 वी पूर्ण केल्यानंतर सुरु झाले, जेव्हा त्या पदवी मिळवण्याचा प्रयत्न करत होत्या. त्या म्हणाला की, अनेक महाविद्यालयांनी त्यांना दृष्टीदोष असल्याने प्रवेश नाकारला होता. त्या म्हणतात की, त्यांना असे एक महाविद्यालय सापडले जे अपंग विद्यार्थी आणि सामान्य विद्यार्थ्यांना एकाच वेळी शिक्षण देते. तेव्हाच त्यांनी ठरवले की, आता आपल्याला अपंग समाजाचे प्रतिनिधित्व करायचे आहे.
हिमानी यांनी सांगितले की, त्या लहान असल्यापासून त्यांच्या मित्र-मैत्रीणींना एकत्र करून केबीसीचा खेळ खेळायची. त्यामुळे त्यांचे सामान्य ज्ञान खूप चांगले झाले. हिमानी म्हणाल्या की, जेव्हा त्या ‘फास्टेस्ट फिंगर’च्या उत्तराची वाट पाहत होत्या, तेव्हा आपण अपंग असल्याने त्या खूप घाबरल्या होत्या. यानंतर त्यांनी आपले धैर्य एकवटले आणि विचार केला की, त्या येथे स्वतःच्या कुटुंबाचा आणि अपंग समाजाचा अभिमान आणखी वाढवण्यासाठी आल्या आहेत. हिमानी बुंदेला यांनी शोमध्ये मिळालेल्या पैशांचा वापर करून एक कोचिंग क्लास उघडण्यासाठी करण्याची योजना बनवली आहे, जिथे अपंग आणि सामान्य मुले एकत्र अभ्यास करू शकतील.
डॉक्टर बनण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या हिमानी आपल्या व्यंगावर मात्र करत आज शिक्षिका बनल्या आहेत. त्यांनी आग्र्याच्या बीडी जैन कॉलेजमधून बीएचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर खनऊमध्ये विकलांगांसाठी तयार करण्यात आलेल्या आशियातील सर्वांत मोठे विद्यापीठ डॉक्टर शकुंतला मिश्रा रीहॅबिलिटेशन युनिव्हर्सिटीमधून त्यांनी डिप्लोमा इन एज्युकेशन पूर्ण केले. यानंतर 2017मध्ये वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी त्या केंद्रीय महाविद्यालयात शिक्षिका म्हणून रुजू झाल्या आहेत.