प्रसिद्ध गायक जस्टीन बिबरने (Justin Bieber) काही दिवसांपूर्वीच रामसे हंट सिंड्रोममुळे त्याच्या चेहऱ्याचा अर्धा भाग पॅरालाईज्ड झाल्याची धक्कादायक माहिती दिली. तेव्हापासून रामसे हंट सिंड्रोम (Ramsay Hunt Syndrome) म्हणजे नेमकं काय, ते कशामुळे होतं याबाबतची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली. आता टेलिव्हिजन अभिनेत्री ऐश्वर्या सखुजा (Aishwarya Sakhuja) हिने जस्टीनसारख्याच समस्येला सामोरं गेल्याचा खुलासा केला आहे. 2014 मध्ये ‘मैं ना भुलूंगी’ या मालिकेसाठी एकानंतर एक एपिसोड शूट करताना ऐश्वर्याच्या चेहऱ्याचा अर्धा भाग पॅरालाईज्ड झाला होता. कामाच्या तणावामुळे आणि थकव्यामुळे असं झालं असावं असा तिला सुरुवातीला वाटलं होतं. ऐश्वर्याने खुलासा केला आहे की ती इतक्या व्यग्र वेळापत्रकात शूटिंग करत होती की तिला उपचारासाठी वेळ मिळत नव्हता. इतकंच नव्हे तर स्क्रीनवर पॅरालाईज झालेला अर्धा चेहरा दिसू नये अशा पद्धतीने शूटिंग केल्याचंही तिने सांगितलं.
याबद्दल ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत ऐश्वर्या म्हणाली, “मालिकेत लग्नाचा सीन असल्याने आम्ही बॅक-टू-बॅक शूटिंग करत होतो. मला आठवतंय की दुसऱ्या दिवशी माझी दुपारी 2 वाजताची शिफ्ट होती आणि आदल्या रात्री रोहित (तेव्हा बॉयफ्रेंड आणि आता पती) मला विचारत होता की तू सारखं डोळा का मारतेस? तो मस्करी करत असेल असं समजून मी त्याकडे लक्ष दिलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मी दातांना ब्रश करत होते तेव्हा मला चूळ भरता येत नव्हतं. तेव्हासुद्धा मला ते थकव्यामुळे झालं असावं असं वाटत होतं. ”
नंतर ऐश्वर्याची रुममेट पूजा शर्माने तिला त्याविषयी सांगितलं. ऐश्वर्याचा चेहरा नेहमीप्रमाणे नॉर्मल दिसत नसल्याचं तिने सांगितलं. जेव्हा ऐश्वर्या डॉक्टरांकडे गेली तेव्हा तिला रामसे हंट सिंड्रोम झाल्याचं निदान झालं. कामाचं व्यग्र वेळापत्रक आणि सततच्या शूटिंगमुळे त्यावेळी आराम करायलाही वेळ मिळाला नसल्याचं ऐश्वर्याने सांगितलं.
“मालिकेतील इतर कलाकार आणि क्रू मेंबर्स यांनी खूपच साथ दिली. माझ्या चेहऱ्याचा अर्धा भाग दिसू नये अशा पद्धतीने त्यांनी शूटिंग केलं. पण त्यातून बरं होणं खूपच कठीण होतं. त्यासाठी दिले जाणारे स्टेरॉइड्स यांमुळे होणारा त्रास आणि अभिनेत्री असल्याने चेहराच सर्वकाही असल्याने त्यातून आलेली निराशा यांचा सामना करणं खूप कठीण होतं”, असं ऐश्वर्या म्हणाली.