मुंबई : ‘हरयाणवी क्वीन’ सपना चौधरी (Sapna Choudhary )अनेकदा वादात अडकत असते. आता पुन्हा एकदा ही अभिनेत्री चर्चेत आली आहे. वृत्तानुसार, लखनऊ न्यायालयाने सपनाविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. एक कार्यक्रम रद्द करून तिकीट खरेदी करणाऱ्यांचे पैसे लुबाडल्याबद्दल सपनावर ही कारवाई करण्यात आली आहे. वृत्तानुसार या प्रकरणाची सुनावणी 22 नोव्हेंबरला होणार आहे.
माध्यम वृत्तानुसार, हे प्रकरण 3 वर्षांपूर्वीचे आहे. 13 ऑक्टोबर 2018 रोजी सपनाचा एक परफॉर्मन्स होणार होता, ज्यासाठी लोकांनी तिकिटे खरेदी केली होती आणि कार्यक्रमाला देखील पोहोचले होते. मात्र, सपना तिथे पोहोचली नाही, त्यानंतर बराच गदारोळ झाला. त्यानंतर लोकांनी तिकिटाचे पैसे परत मागितले असता त्यांना तेही मिळाले नाहीत.
आता सपना आणि तिच्यासह इतरांवर कारवाई होणार आहे. तसे, या प्रकरणी सपना किंवा तिच्या बाजूने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
काही महिन्यांपूर्वी सपनाचा मृत्यू झाल्याची बातमी आली, तेव्हा ती प्रसिद्धीच्या झोतात आली होती. तिचा अपघाती मृत्यू झाल्याची फेक न्यूज व्हायरल झाली होत होती. ही बातमी ऐकून चाहत्यांना धक्काच बसला आणि ते अस्वस्थ झाले होते. यानंतर सपनाने स्वतः पुढे येऊन हे वृत्त चुकीचे असल्याचे सांगितले होते.
रिपोर्ट्सनुसार, सपना म्हणाली होती की, मी ज्या प्रोफेशनमध्ये काम करते, त्यामध्ये अनेक प्रकारच्या अफवा पसरत असतात, पण अशा अफवांमुळे कुटुंबाला त्रास होतो. माझा विश्वासच बसत नाही की, कोणीतरी अशा प्रकारे अफवा पसरवू शकते. ही अफवा ऐकून माझे कुटुंब खूप अस्वस्थ झाले आहे. जरा कल्पना करा की एखाद्या पालकांना त्यांच्या मुलाचे निधन झाल्याचे फोन येऊ लागतील तेव्हा त्यांचे काय होईल?
सपनाने काही चित्रपटांमध्ये काम केले असले, तरी तिला आणखी अनेक चित्रपटांमध्ये काम करायचे आहे. मात्र तिला सध्या संधी मिळत नाहीय. सपनाने एका मुलाखतीत सांगितले होते की, मला हिंदी टीव्ही शो आणि चित्रपटांमध्ये काम करायचे आहे. पण मी प्रादेशिक इंडस्ट्रीतील आहे, त्यामुळे मला तितक्या संधी मिळत नाहीत. मला तिथेही माझी प्रतिभा दाखवायची आहे. मला असे वाटते की, यामागील एक कारण म्हणजे मला इंग्रजी येत नाही आणि बोल्ड कपडे परिधान करता येत नाही, कदाचित त्यामुळेच मला काम मिळत नाही.
सपना सध्या तिच्या हरियाणवी गाण्यांवर लक्ष केंद्रित करत आहे आणि त्याशिवाय ती कुटुंबासोबत दर्जेदार वेळ घालवत आहे.