सोनी मराठी (Sony Marathi) वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) हा विनोदी कार्यक्रम प्रचंड लोकप्रिय आहे. या कार्यक्रमाने महाराष्ट्रातल्याच नव्हे तर जगभरातल्या प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या कार्यक्रमाचे अनेक चाहते आहेत आणि यांमध्ये अनेक दिग्गज नामवंतांचाही समावेश आहे. नुकतेच या कार्यक्रमाचे 500 भाग पूर्ण झाले. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी लाफ्टर थेरपीच बनला आहे. आता हा कार्यक्रम आठवड्यातून पाच दिवस प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोमवार 25 एप्रिलपासून सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता प्रसारित होणार आहे.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाला पहिल्या भागापासून प्रेक्षकांचं प्रेम मिळू लागलं. समीर, प्रसाद, नम्रता, गौरव, वनिता आणि हास्यजत्रेतल्या इतर हास्यवीरांनी प्रेक्षकांना आपल्या विनोदांनी खळखळून हसवलं. लॉकडाऊनच्या कठीण काळातही हा कार्यक्रम रसिकांचे मनोरंजन करत होता. आता आठवड्यातले पाच दिवस हा कार्यक्रम प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. उन्हाळ्याची सुट्टीही सुरू झाल्याने आता या धमाल विनोदी कार्यक्रमाचा आस्वाद सहकुटुंब घेता येणार आहे. सध्या प्रत्येक भागात मोठमोठे कलाकार हास्यजत्रेच्या मंचावर उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवताहेत.
अल्पावधीत केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात लोकप्रियतेचा उच्चांक गाठलेला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा सगळ्यांचा आवडता कार्यक्रम आठवड्यातून पाच दिवस रसिकांच्या भेटीस येणार आहे. या कार्यक्रमातले कलाकारही आठवड्यातून पाच दिवस प्रेक्षकांना भेटण्यासाठी उत्सुक आहेत.
हेही वाचा:
Aai Kuthe Kay Karte: ‘आई कुठे काय करते’च्या शूटिंगदरम्यान रुपाली भोसलेला दुखापत