मुंबई : ‘झी मराठी’ने नव्या नात्यांच्या बंधू गाठी म्हणत ऑगस्ट महिन्यात तब्बल 5 नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आणून त्यांच्यासाठी मनोरंजनाची मेजवानीच सादर केली. या सर्वच नवीन मालिकांना प्रेक्षकांचे प्रेम आणि उदंड प्रतिसाद मिळतोय. त्यातील एक अल्पावधीतच लोकप्रिय झालेली मालिका म्हणजे मंदार देवस्थळी दिग्दर्शित ‘मन उडू उडू झालं’. प्रेक्षकांचे लाडके कलाकार – हृता दुर्गुळे आणि अजिंक्य राऊत हे या मालिकेतून त्यांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाले. इंद्रा आणि दिपूच्या जोडीवर आणि या मालिकेवर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत पण त्याचसोबत या मालिकेच्या शीर्षक गीतावर देखील प्रेमाचा वर्षाव होतोय.
गायक अवधूत गुप्ते आणि आघाडीची गायिका आर्या आंबेकर यांनी गायलेलं आणि सलील कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं प्रेक्षकांना ताल धरायला भाग पाडतंय. इतकंच नव्हे तर, ‘मन उडु उडु झालं’च्या उडत्या चालीवर मुंबईच्या रिक्षावाल्यांनाही ठेका धरण्याचा मोह आवरला नाहीय. या गाण्याच्या धूनवर रिक्षा चालकांनी तयार केलेला माहोल सध्या एका व्हिडीओतुन प्रचंड व्हायरल होतोय.
हा व्हिडीओ झी मराठीने त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट केला असून त्यातून मालिकेवर प्रेक्षकांचं असलेलं प्रेम झळकत आहे. या व्हिडीओवर देखील नेटिझन्स आपल्या प्रतिक्रियांमधून मालिका आणि त्याच्या शीर्षकगीतावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. प्रेक्षकांचं हे प्रेम पाहून अल्पावधीतच मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं असं म्हंटल तर खोटं ठरणार नाही.
आपल्या सौंदर्याने आणि अभिनय कौशल्याने लोकप्रिय अभिनेत्री हृता दुर्गुळे (Hruta Durgule) हिने तमाम प्रेक्षकांच्या मनाला भुरळ पाडली आहे. ती अक्षरशः तरुणांच्या गळ्यातील ताईत बनली आहे. ‘फुलपाखरू’ या मालिकेनंतर हृताचे चाहते तिच्या नवीन मालिकेची अत्यंत आतुरतेने वाट बघत होते. या मालिकेच्या निमित्ताने ती पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
या मालिकेतील आपल्या भूमिकेबद्दल सांगताना अजिंक्य राऊत म्हणतो की, ‘यात मी इंद्रजीत नावाची व्यक्तिरेखा साकारत असून, हा इंद्रा या नावानं ओळखला जातो. हा कॅालेजमध्ये गोल्ड मेडल मिळवलेला मुलगा आहे. खूप सोफेस्टिकेटेड, आईचा लाडका, कुटुंबात थोरला आहे. मनाप्रमाणं किंवा गुणवत्तेनुसार काम मिळत नसल्यानं तो एक प्रकारचं काम स्वीकारतो. त्यातही तो प्रामाणिकपणा आणि माणूसकी जपतो. काम वेगळ्या धाटणीचं असल्यानं ते करताना त्याला मजा येतेय. मूळात अजिंक्य म्हणून मी असा मुळीच नाही. माझा स्वभाव नसताना ते उत्तमरीत्या प्रेक्षकांसमोर सादर करण्याचं आव्हान या कॅरेक्टरमध्ये आहे.’