बिग बॉस मराठी सीझन पाच जिंकल्यानंतर राज्यभरातून सूरज चव्हाण याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सुनेत्रा पवार यांनी सूरज चव्हाण याचं भरभरुन कौतुक केलं आहे. सुनेत्रा पवार यांनी फेसबुकवर पोस्ट टाकत सूरज चव्हाण याचं कौतुक केलं आहे. “बारामतीचा सूरजने बिग बॉस जिंकले! आपल्या बारामती तालुक्यातील मोढवे गावच्या सुपुत्राने बिग बॉस शोचे विजेतेपद पटकावले. त्याचे कौतुक करायला शब्द अपुरे पडतायत. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून पुढे आलेला सूरज स्वत:च्या कलागुणांच्या बळावर आज जगभरात जिथे जिथे मराठी लोक आहेत तिथपर्यंत प्रसिद्धी पावला आहे. समस्त मराठी मनांचा लाडका झाला आहे”, असं सुनेत्रा पवार म्हणाल्या.
“सूरजने पहिल्या दिवसापासून बिग बॉस शोमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तेव्हाच खात्री पटली होती की, हे लेकरू बाजी मारणार. ती खात्री आज प्रत्यक्षात साकारली आहे. सूरजला पाठिंबा देण्यासाठी आम्ही आवाहन केले होते. त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला. अवघ्या काही दिवसांपूर्वी त्याच्या मोढवे गावी जाऊन तो विजयी होईल असा विश्वास व्यक्त केला होता. त्याला शुभेच्छा दिल्या होत्या. त्याचे सार्थक झाले. या उत्तुंग यशाबद्दल सूरजचे खूप खूप अभिनंदन”, असं म्हणत सुनेत्रा पवार यांनी सुरजचं कौतुक केलं आहे.
सूरज चव्हाण हा मूळचा बारामतीचा आहे. तो बारामतीमधील मोडवे गाव येथे वास्तव्यास आहे. सूरज चव्हाण हा आता लोकप्रिय आणि प्रसिद्धीच्या झोतात आला असला तरी त्याचं वैयक्तिक आयुष्य खूप खडतर राहिलं आहे. सूरजचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला होता. तो लहान असतानाच त्याच्या आई-वडिलांचं निधन झालं होतं. त्याची घरातील परिस्थिती बेताची असल्यामुळे त्याला इयत्ता आठवी पर्यंतच शिक्षण घेता आलं होतं. सूरजला पाच बहिणी आहेत. यांपैकी मोठ्या बहिणीने सूरजचा सांभाळ केला.
सूरज मोलमजुरी करायचा. या दरम्यान त्याला टिकटॉक बद्दल समजलं. त्याने सुरुवातीला एक-दोन व्हिडीओ टाकून पाहिले. ते व्हिडीओ व्हायरल झाले. यानंतर सूरजने मेहनत करुन स्वत:च्या हिंमतीवर मोबाईल खरेदी केला. त्यामोबाईलमध्ये त्याने टिकटॉक डाऊनलोड केलं आणि तो व्हिडीओ शेअर करु लागला. त्याच्या व्हिडीओला चांगली प्रसिद्धी मिळाली. त्याचे व्हिडीओ खूप व्हायरल झाले. यामुळे त्याला काही यूट्यूब चॅनलकडून शॉर्ट फिल्मसाठी ऑफर येऊ लागल्या. टिकटॉक बंद झाल्यानंतर सूरजने यूट्यूब चॅनल सुरु केलं. तिथे देखील त्याला लाखो चाहत्यांनी प्रतिसाद दिला. त्यामुळे सूरज आज बिग बॉसच्या घरापर्यंत पोहोचू शकला.