‘सासू-सुनेचं प्रेम, जिवलग मैत्रिणींसारखं सेम’, असं म्हणत सुरू झालेली ‘सुंदर आमचे घर’ (Sundar Amche Ghar) ही मालिका आता एका उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे. लग्नानंतर काव्या आता राजपाटील यांची सून होऊन घरी येणार आहे. सुभद्रा आणि काव्या यांच्यामधलं म्हणजेच सासू-सुनेमधलं मैत्रीचं नातं कसं फुलतं, हे आता प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. जुने आणि आधुनिक विचार यांच्यातील भेद यांमुळे घरात काय घडतं, हे ‘सुंदर आमचे घर’ या मालिकेत पाहायला मिळत आहे. पुरुषांचं वर्चस्व असलेल्या राजपाटील कुटुंबात स्त्रियांचं महत्त्व पटवून देण्यात काव्या म्हणजेच मालिकेची नायिका आता यशस्वी होते का, त्यासाठी ती काय करते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. (Marathi Serial)
काव्या लग्न करून राजपाटील यांच्या घरात येण्याआधीच तिची सुभद्राशी म्हणजेच तिच्या सासूशी चांगली गट्टी जमली आहे. काव्याचं तिच्या सासूशी जमलेलं चांगलं सूत काव्याची आजेसासू म्हणजे नारायणी बिघडवू शकते का किंवा बिघडवण्यासाठी काय करते, हे बघणं आता मनोरंजक ठरणार आहे. या सासूसुनेच्या जोडीची मैत्री नारायणी होऊ देणार की नाही, हे या मालिकेत बघायला मिळणार आहे. ही मालिका सासू आणि सून यांच्यामध्ये असणारं मैत्रीचं नातं अधोरेखित करणार आहे. तीन पिढ्यांतल्या सुना म्हणजे काव्या, सुभद्रा आणि नारायणी एकाच घरात वावरत असताना काय गमतीजमती घडतात, हे पाहणंही मनोरंजक ठरणार आहे. आता खऱ्या अर्थाने सासूसुनेच्या मैत्रीचा प्रवास प्रेक्षकांना बघता येणार आहे.
तीन वेगवेगळ्या पिढ्यांतल्या स्त्रिया एका घरात एकत्र नांदू लागल्यानंतर एकाच गोष्टीकडे बघण्याचे तीन वेगवेगळे दृष्टिकोन आता प्रेक्षकांना पहायला मिळणार आहेत. आता नारायणी आणि काव्या यांची वैचारिक जुगलबंदी मालिकेत रंगणार आहे. त्याचबरोबर नारायणी काव्याला नातसून म्हणून स्वीकारणार का, रितेश आणि काव्याचं लग्न नारायणी टिकू देणार का, काव्याशी नारायणी कशी वागणार, काव्या राजपाटील कुटुंबाच्या विचारसरणीला बदलू शकेल का; या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मालिकेच्या पुढील भागात मिळणार आहेत. ‘सुंदर आमचे घर’ ही मालिका 25 एप्रिलपासून सोमवार ते शनिवार रात्री 8 वाजता सोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
हेही वाचा:
KGF 2: थांबायचं न्हाय आता थांबायचं न्हाय! 11 दिवसांत ‘केजीएफ 2’च्या कमाईचा थक्क करणारा आकडा
जिच्यासाठी विल स्मिथने ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात केला राडा; तीच घेणार घटस्फोट?