बिग बॉस मराठी सीझन पाचमधून अभिनेत्री निक्की तांबोळी ही अखेर बाहेर पडली आहे. निक्की तांबोळी ही टॉप 3 स्पर्धकांपैकी एक ठरली. पण टॉप 2 च्या शर्यतीत निक्की तांबोळी ही बाद ठरली. निक्की तांबोळी हिचा बिग बॉसमधील प्रवास वेगवेगळ्या छटांचा राहिला. पण तिचं बेधडकपणे बोलणं यामुळे ती चर्चेत राहिले. निक्की तिच्या भांडणांमुळे कायम चर्चेत राहिली. तिला कॉन्टेन्टची महाराणी म्हटलं जात होतं. तिचे बिग बॉसमधील डायलॉग चांगलेच प्रसिद्ध ठरले. पण तरीही तिच्या वागणुकीमुळे तिला काही वेळेला चाहत्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं.
ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांच्यासोबतच्या भांडणामुळे तिच्यावर चाहते नाराज झाले होते. पण तरीही तिने बिग बॉसच्या घरात आपलं अस्तित्व कायम ठेवलं. तिचा हा प्रवास टॉप 3 पर्यंत पोहोचला. पण त्यापुढे जाऊ शकली नाही. अखेर बिग बॉसच्या घरात अभिजीत सावंत आणि सुरज चव्हाण हे टॉप 2 स्पर्धक ठरले. आता दोघांपैकी कोण बाहेर जातं आणि कोण विजयी होतं त्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
बिग बॉसचा ग्रँड फिनाले सोहळा नेहमीप्रमाणे दिमाखदार राहिला. या सोहळ्यात विविध स्पर्धकाने नृत्य सादर करत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. यावेळी इलिमिनेशन टास्कही पार पडला. सर्वात आधी जान्हवी किल्लेकर घराबाहेर पडली. पण ती विजेत्यानंतर दुसरी स्पर्धक ठरली आहे जी सर्वाधिक रक्कम घरी घेऊन जाणार आहे. जान्हवी किल्लेकर हिने 9 लाख रुपये घेऊन घराबाहेर जाणं पसंत केलं. विशेष म्हणजे तिने बिग बॉसची ऑफर मान्य केल्याने तिचा फायदा झाला. कारण इलिमिनेट होणारी पहिली स्पर्धक तिच होती. पण तिने बिग बॉसची ऑफर मान्य करत खेळातून बाद होणं पसंत केलं. तिचा हा निर्णय योग्य ठरला.
यानंतर अनपेक्षित असा निकाल लागला. कारण अंकिता वालावलकर ही घराबाहेर पडली. ती टॉप 4 मध्ये पोहोचू शकली नाही. त्यामुळे तिच्या चाहत्यांचा मोठा हिरमोड झाला. यानंतर धनंजय पोवार बाद झाला. यानंतर निक्की तांबोळी बाद झाली. यानंतर सुरज चव्हाण आणि अभिजीत सावंत यांच्यात विजेता पदासाठी चुरस बघायला मिळाली.