मुंबई : राजू श्रीवास्तव (Raju Srivastav) हे गेल्या 21 दिवसांपासून दिल्लीतील एम्समध्ये दाखल आहेत. तिथे त्यांच्यावर डॉक्टरांची (Doctor) टीम उपचार करत असून राजू श्रीवास्तव यांच्या तब्येतीबाबत दररोज वेगवेगळे अपडेट पुढे येत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली होती. यामुळे चाहते आणि कुटुंबियांमध्ये आनंदाचे वातावरण बघायला मिळाले. नुकताच कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या कुटुंबियांनी सांगितले आहे की, राजूशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या अफवा आणि खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका. आम्ही स्वत: राजू यांच्या तब्येतीबाबत (Health) अपडेट तुमच्याशी शेअर करू…
काही दिवसांपूर्वी राजू श्रीवास्तव यांच्या तब्येतीत सतत चढ-उताराच्या बातम्यांनी सर्वांनाच घाबरवले होते. त्यानंतर डॉक्टरांच्या देखरेखीनंतर त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या ते व्हेंटिलेटरवर असून तज्ज्ञ डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करत आहे. राजू श्रीवास्तव यांचे कुटुंबीयही सातत्याने प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियावर संवाद साधून सर्व माहिती देत आहेत. सध्या राजू यांची तब्येत स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.
10 ऑगस्ट रोजी जिममध्ये व्यायाम करत असताना राजू श्रीवास्तव यांची प्रकृती अचानक बिघडली आणि छातीत तीव्र वेदना होऊ लागल्या. त्यानंतर ते खाली पडले. त्यांना लगेचच दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगितले. राजू यांना हॉस्पिटलमध्ये दाखल होऊन आज 21 दिवस झाले आहेत. राजू यांची तब्येत चांगली व्हावी, यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.