मुंबई : छोट्या पडद्यावर गाजलेल्या ‘कौन बनेगा करोडपती’ (Kon Honaar Crorepati) या प्रसिद्ध कार्यक्रमाचा मराठी अवतार म्हणजे ‘कोण होणार करोडपती’. 2019ला या कार्यक्रमाचे पहिले पर्व प्रदर्शित झाल्यावर गेल्यावर्षी कोरोनामुळे या कार्यक्रमाला विश्राम घ्यावा लागला होता. परंतु, आता कोरोना परिसथिती थोडी आटोक्यात आल्यावर आता दुसरे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.
या कार्यक्रमाच्या पहिल्या भागाचे सूत्रसंचालन ‘सैराट’ फेम नागराज मंजुळे यांनी केले होते व आता दुसऱ्या भागासाठी जेष्ठ अभिनेते सचिन खेडेकर (Sachin Khedekar) यांची वर्णी लागलीय. मराठी घराघरांत सगळ्यांना सचिन खेडेकर परिचित आहेत. ‘कोण होणार करोडपती’ हा कार्यक्रम सगळ्यांच्या पसंतीस उतरतो आहे. ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर नुकताच सचिन खेडेकर यांनी अल्बर्ट आईनस्टाईन यांचा एक किस्सा प्रेक्षकांना सांगितला आहे. चला तर ऐकुया हा खास किस्सा…
अल्बर्ट आईन्स्टाईन एकदा जपानच्या दौऱ्यावर होते. त्यांनी जपान मधील एका हॉटेलमध्ये मुक्काम केला होता. नेमकी त्याचवेळी तिथेच त्यांना एक बातमी आली. नोबेल पारितोषिक जाहीर झालीची ती बातमी होती. नोबेल पारितोषिक जाहीर झालं अशी बातमी घेऊन येणाऱ्या माणसाला त्यांनी आनंदात काहीतरी बक्षीस द्यायचं ठरवलं. पण नेमके त्याक्षणी त्यांच्याकडे काहीच पैसे नव्हते. मग, त्यांनी एक कागद घेतला आणि त्यावर त्या माणसासाठी काही ओळी लिहिल्या. या ओळींचा मतितार्थ होता, यश मिळवण्यासाठी केलेल्या धडपडीत बैचेनी आणि खूप अस्वस्थता असते, त्यापेक्षा शांततेत आणि साधेपणाने जगलेले आयुष्य जास्त समाधान देते.
एका अत्यंत यशस्वी आणि जगातल्या सगळ्यात बुद्धिमान मानल्या जाणाऱ्या माणसाने एका साध्या कागदावर दिलेला हा दोन ओळींचा संदेश. आईन्स्टाईन यांनी ज्या माणसाला हा संदेश लिहून दिला त्यांच्या नातेवाईकांनी त्या संदेशाचा लिलाव केला. खुद्द आईन्स्टाईन यांचे हस्ताक्षर असल्यामुळे काही कोटींमध्ये तो कागद विकला गेला. तो जगात सगळ्यात जास्त किमतीला विकला गेलेला संदेश मानला जातो. पण तेव्हढीच महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे तो संदेश जपून ठेवणारा व्यक्ती. त्याने त्या संदेशाचं महत्त्व जाणलं आणि तो जपून ठेवला. याच कागदाने त्यांना कोट्यावधी रुपये मिळवून दिले.
सध्या ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमाचं चित्रीकरण मुंबई फिल्मसिटीमध्ये सुरू आहे. ‘कोण होणार करोडपती’ आणि ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमांचं पहिल्यांदाच एकत्र चित्रीकरण होतं आहे. 12 जुलैपासून ‘कोण होणार करोडपती’ सुरू झालं होतं. या दोन्ही कार्यक्रमांचं चित्रीकरण हे शेजारीशेजारी असलेल्या सेट्सवर सुरू आहे. जेव्हा ‘बिग बी’ अमिताभ बच्चन यांना समजलं की, बाजूच्या सेटवर ‘कोण होणार करोडपती’चं चित्रीकरण सुरू आहे, तेव्हा त्यांनी सचिन खेडेकर यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. सचिन खेडेकर आणि अमिताभ बच्चन यांची भेट झाली, तेव्हा अमिताभ बच्चन यांनी ‘कोण होणार करोडपती’चं भरभरून कौतुक केलं आणि हा कार्यक्रम आपण पाहत असल्याचा आवर्जून उल्लेख केला!
‘यंदाचा उन्हाळा होणार सनी’, ललित प्रभाकर नव्या चित्रपटातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला!
‘जानी दुश्मन’ फेम अभिनेता रजत बेदीच्या कारची पादचाऱ्याला धडक, प्रकृती गंभीर