सोनी मराठी वाहिनीवरील (Sony Marathi) ‘तुमची मुलगी काय करते’ (Tumchi Mulgi Kay Karte) या मालिकेला सध्या रंजक वळण मिळाले आहे. श्रद्धा आणि अभय मिरजकर यांची मुलगी सावनी बेपत्ता झाली असून श्रद्धा आपल्या मुलीला शोधण्यासाठी सर्वतोपरीने प्रयत्न करते आहे. पोलिसांकडून श्रद्धावर कडक नजर ठेवण्यात येत आहे. त्यातच या शोधात श्रद्धाला भेटलेली ‘ताई’ श्रद्धाच्या जिवावर उठली आहे. त्यामुळे आता श्रद्धा आपल्या मुलीला शोधू शकेल का, सावनी खरंच गुन्हेगार असेल का, अशा प्रश्नांची उत्तरं मालिकेच्या आगामी भागांमधून प्रेक्षकांना मिळणार आहेत. त्यातच ज्येष्ठ अभिनेते संजय मोने (Sanjay Mone) यांची एण्ट्री झाल्याने आता मालिकेत आणखी रंजकता येणार आहे.
‘तुमची मुलगी काय करते?’ या मालिकेत श्रद्धा आपल्या मुलीच्या, सावनीच्या शोधासाठी अनेक प्रकारे प्रयत्न करतेय. या सगळ्या शोधात ती ताई नावाच्या एका कुख्यात स्त्रीकडे जाऊन पोचली, पण ताईला पकडून देण्यासाठी तिने पोलिसांना मदत केली. त्यामुळे ताईच्या विरोधात गेल्याने ताई श्रद्धाच्या जिवावर उठली आहे आणि तिच्या मदतीला आता ‘व्यंकट सावंत’ आला आहे. ‘तुमची मुलगी काय करते’ या मालिकेत ज्येष्ठ अभिनेते संजय मोने ‘व्यंकट सावंत’ नावाचे पात्र साकारत आहेत.
संजय मोने यांचं ‘तुमची मुलगी काय करते?’ या मालिकेमधून अनेक वर्षांनी छोट्या पडद्यावर पुनरागमन झालं आहे. श्रद्धाचा जीव घेण्यासाठी आलेल्या ताईच्या माणसांपासून व्यंकट सावंत श्रद्धाला वाचवतात. व्यंकट सावंत या पात्राचा उल्लेख आत्तापर्यंत श्रद्धाचे वडील म्हणून आला आहे. संजय मोने यांचा दर्जेदार अभिनय आणि वेगळा ठसका प्रेक्षकांना आवडेल याची खात्री आहे. मधुरा वेलणकर, संजय मोने यांसारखी तगडी कलाकार मंडळी मालिकेत असल्याने या मालिकेची रंगत आणखीनच वाढणार आहे. श्रद्धाचा शोध संपेल का, सावनी खरंच निर्दोष असेल का, ताईपासून श्रद्धाचा जीव वाचेल का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना मालिकेत पुढे मिळणार आहे. ‘तुमची मुलगी काय करते?’ ही मालिका दररोज रात्री 10 वाजता सोनी मराठी वाहिनीवर प्रसारित होते.
हेही वाचा:
ब्लॉकबस्टर ‘पावनखिंड’ आता OTTवर पाहता येणार; ‘या’ तारखेला ॲमेझॉन प्राइम व्हिडीओवर होणार स्ट्रीम
Best Holi Songs: रंगांची उधळण करताना थिरकायला लावणारी ‘ही’ टॉप 5 गाणी