शक्तीमान (Shaktimaan) या मालिकेतून घराघरात पोहोचलेले अभिनेते मुकेश खन्ना (Mukesh Khanna) अडचणीत सापडले आहेत. मुलींबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी दिल्ली महिला आयोगाने त्यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेत कठोर भूमिका घेतली आहे. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल (Swati Malliwal) यांनी मुकेश खन्ना यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यास सांगितलं आहे. एवढंच नाही तर त्यांनी दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलला नोटीस बजावून मुकेश खन्ना यांच्यारुद्ध एफआयआर नोंदवण्याची मागणी केली आहे. त्यांचं वक्तव्य निंदनीय असल्याचं सांगत स्वाती मालीवाल यांनी कारवाईची मागणी केली. “जी मुलगी एका मुलाला सेक्ससाठी विचारते, ती मुलगी नसून ती सेक्सचा व्यवसाय करत असते. लोकांनी अशा गोष्टींमध्ये पडू नये”, असं वक्तव्य मुकेश यांनी केलं होतं. आपल्या युट्यूब चॅनलवर त्यांनी व्हिडीओ पोस्ट करत हे मत व्यक्त केलं होतं.
मुकेश खन्ना यांच्या या वादग्रस्त विधानावर चौफेर टीका होत असतानाच दिल्ली महिला आयोगाने या विधानाबद्दल मुकेश खन्ना यांच्यावर कारवाई करण्याची नोटीस पोलिसांना दिली होती. आता नोटीशीनंतर मुकेश खन्ना यांना स्पष्टीकरण द्यावं लागलं. त्यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं ‘सोशल मीडियाचं विचित्र जग! शिकण्यासारख्या चांगल्या गोष्टी आहेत. पण चांगल्या गोष्टींपेक्षा वाईट शिकणारे जास्त आहेत. चांगल्या गोष्टींमधून वाईट गोष्टी निर्माण करणारे लोक कमी नाहीत. मी दिलेल्या संदेशाला वाईट रंग देऊन मला ट्रोल केलं जात आहे.’
मुकेश खन्ना यांचा व्हिडिओ खूप व्हायरल झाला आहे. यामध्ये ते असं म्हणताना दिसत आहे की, ‘जी मुलगी एखाद्या मुलाला शारीरिक संबंध ठेवण्यास सांगते, ती धंदा करते. लोकांनी अशा गोष्टींमध्ये पडू नये. जर एखाद्या मुलीने असं म्हटलं तर याचा अर्थ असा होतो की ती मुलगी कोणत्याही सुसंस्कृत समाजाची नाही, कारण सुसंस्कृत समाजातील मुलगी असं म्हणणार नाही.’ त्यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर चौफेर टीकाही झाली. त्यानंतर दिल्ली महिला आयोगाने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.