मुंबई : राष्ट्रमाता जिजाऊंनी स्वराज्याला दिलेलं नैतिक अधिष्ठान खूप मोलाचे होते. हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, संघटन, व्यवस्थापन, शस्त्रविद्या यासोबत पराक्रम, मुत्सद्देगिरी आणि चातुर्य अशा सत्वगुणांचे बाळकडू देणाऱ्या राजमाता जिजाऊंचाही स्वराज्य संस्थापनेत मोठा वाटा होता.
या रणरागिणीची यशोगाथा उलगडून दाखविणाऱ्या सोनी मराठी वाहिनीवरील ‘स्वराज्यजननी जिजामाता’ (Swarajyajanani Jijamata) या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक हक्काचं स्थान मिळवलं आहे. महाराष्ट्राच्या अभिमानाची यशोगाथा, जिजाऊंचे संस्कार या मालिकेद्वारे प्रेक्षकांना पहायला मिळत आहेत.
काही मालिका अशा असतात ज्यांचा प्रभाव प्रेक्षकांच्या मनावर कायमस्वरूपी रहातो. ‘जगदंब क्रिएशन्स’ निर्मित ‘स्वराज्यजननी जिजामाता’ ही मालिकादेखील अशाच प्रकारची मालिका आहे. अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या या मालिकेने नुकताच 500 भागांचा यशस्वी टप्पा गाठला आहे.
यावेळी बोलताना मालिकेचे निर्माते व सर्व कलाकार म्हणाले की, ‘500 भागांचा टप्पा गाठणं ही आम्हां सर्वांसाठीच खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं आणि त्यामुळेच आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलो. आमच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व रसिकांप्रती आम्ही अतिशय कृतज्ञ आहोत. आम्हा सर्वांसाठी हा एक सुंदर प्रवास आहे आणि आम्हाला आशा आहे की आम्ही असे अनेक टप्पे पार करू’.
लोकोत्तर नेतृत्व नकळत अनेक जीवनमूल्ये देऊन जातात. ‘इतिहासाशी इमान राखून वर्तमानाला आकार देत भविष्य घडविण्याची खूप मोठी जबाबदारी आपल्या पिढीवर आहे. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ आणि ‘स्वराज्यजननी जिजामाता’ या मालिकेच्या निमित्ताने हा वसा जपण्याचा व तो सर्वांपुढे मांडण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न या दोन्ही मालिकांच्या यशाचं गमक असल्याचे डॉ. अमोल कोल्हे यांनी या गौरवशाली प्रसंगी सांगितले.
महाराष्ट्राचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्यगाथांनी अत्यंत समृद्ध झाला आहे. उत्कृष्ट नायक, उत्तम संघटक आणि पराक्रमी योद्धा म्हणून त्यांनी आजवर अनेक यशस्वी मोहिमा फत्ते केल्या आहेत. त्यांच्या अनेक शौर्यकथांमधून महाराजांच्या शौर्याची आणि कुशाग्र बुद्धिमत्तेची झलक पाहायला मिळते. सोनी मराठी वाहिनीवरील ‘स्वराज्यजननी जिजामाता’ या लोकप्रिय मालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील महत्त्वाचे लढे आणि रणरागिणी जिजामातांचा इतिहास पाहायला मिळणार आहे.
(Sony Marathi Golden phase of 500 episodes of ‘Swarajyajanani Jijamata’)