छोट्या पडद्यावरील सर्वांत लोकप्रिय मालिकांमध्ये ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चं (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) नाव आवर्जून घेतलं जातं. या मालिकेतील प्रत्येक पात्रं घराघरात परिचयाचं झालं आहे. मालिकेत बबिताची (Babita) भूमिका साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता (Munmun Dutta) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी ती व्हिडीओदरम्यान जातीवाचक शब्द वापरल्यामुळे नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली होती. तर मालिकेत टप्पूची भूमिका साकारणारा अभिनेता राज अनाडकत आणि मुनमुन एकमेकांना डेट करत असल्याच्याही चर्चा होत्या. आता मुनमुन एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आली आहे. हे कारण म्हणजे तिने सुरू केलेलं नवं रेस्टॉरंट. मुनमुन स्वत: खवय्यी असून तिने रेस्टॉरंट व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. याबद्दलची माहिती खुद्द तिने सोशल मीडियावरील पोस्टद्वारे दिली आहे.
मुनमुन दत्ताने हा व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर शेअर केला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून ती तिच्या फूड बिझनेसबद्दल सांगत आहे. मुनमुनने तिच्या मॅनेजरसोबत मिळून हा नवीन व्यवसाय सुरू केला आहे. केयुर शेठ असं तिच्या मॅनेजरचं नाव असून हे दोघं एकमेकांना १४ वर्षांपासून ओळखतात. केयुर हा मुनमुनचा मानलेला भाऊसुद्धा आहे.
फेब 87 (Feb 87) असं त्यांनी या नव्या रेस्टॉरंटला नाव दिलं आहे. गुजराती स्पेशल, चायनीज, कॉन्टिनेंटल अशा विविध प्रकारचे पदार्थ या रेस्टॉरंटमध्ये मिळतील. फेब 87 सोबतच ‘द मॉन्क स्पून’, ‘बॉलिवूड ज्युस फॅक्टरी’ आणि ‘चा थेपला’ अशी तिच्या रेस्टॉरंटची नावं आहेत. मुनमुनने हा व्यवसाय सुरू करताच ती मालिका आणि अभिनयक्षेत्र सोडणार की काय अशी चर्चा चाहत्यांमध्ये रंगली आहे. मात्र मुनमुनने अभिनय सोडणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.