देवमाणूस (Devmanus) या मालिकेने पहिल्या पर्वापासूनच प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे. आता दुसऱ्या पर्वाला देखील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. ही मालिका इन्स्पेक्टर मार्तंड जामकर (Milind Joshi) यांच्या एंट्रीनंतर अतिशय रंजक वळणावर आली आहे. पण देवमाणूस या मालिकेत क्षणाक्षणाला प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का मिळतो. अशातच मालिकेत अजून एक ओळखीचा चेहरा एक महत्वाची भूमिका साकारताना दिसतोय. मालिकेत आमदार बाईची भूमिका साकारणारा चेहरा प्रेक्षकांच्या ओळखीचा आहे. ही भूमिका अभिनेत्री तेजस्विनी लोणारी (Tejaswini Lonari) साकारतेय.
या आपल्या नवीन भूमिकेबद्दल बोलताना तेजस्विनी म्हणाली, “देवमाणूसमध्ये मी आमदार देवयानी गायकवाड ही भूमिका साकारतेय. देवयानी हे एक अतिशय स्ट्राँग व्यक्तिमत्व आहे आणि ती तिचं काम करत असताना तिच्या वाकड्यात जर कोणी शिरलं तर ती त्या व्यक्तीला सोडत नाही हे ती वारंवार दाखवून देते. त्यामुळे गावात तिचा दबदबा आहे. राणी पद्मिनी या मालिकेनंतर मी अनेक चित्रपट केले आणि चित्रपटांमध्ये काम करण्याचा अनुभव खूपच वेगळा होता. त्यानंतर देवमाणूस ही माझी पहिलीच मराठी मालिका आहे. त्यामुळे या मालिकेत काम करण्याच्या अनुभव पूर्णपणे वेगळा आहे. माझे सगळे सहकलाकार खूपच सकारात्मक आहेत. सगळ्यांसोबत अजून माझे सीन्स झाले नाहीत, पण सीन्सच्या आधी मला रिहर्सलमध्ये सगळे खूप मदत करतात. सेटवर खूप खेळीमेळीचं वातावरण असतं.”
आमदारबाईसोबत डील करण्यासाठी अजित आणि डिम्पल जातात पण तिचा रुबाब आणि वागणं पाहून दोघेही धास्तावतात. आमदार बाई ही खूप डेंजर आहे असं डिम्पल अजितला सांगते. आता आमदार बाईंमुळे मालिकेत कोणता ट्विस्ट येणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.