मुंबई : ‘तारक मेहता का उल्टा चश्मा‘ ही टीव्हीवरील सीरिअल गेल्या काही दिवसांपासून वादात अडकली आहे. या सीरिअलमधील करामतीवरून ही सीरिअल वादात अडकलेली नाही तर सीरिअलबाहेरच्या करामतीमुळे ही सीरिअल अधिकच अडचणीत आली आहे. या सीरिअलमध्ये रोशन भाभीची भूमिका साकारणाऱ्या जेनिफर मिस्त्री या अभिनेत्रीने मालिकेचे निर्माते असित मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्यावर गैरवर्तनाचा आरोप केला आहे. त्यामुळे एकच वादळ निर्माण झालं होतं. पण हे आरोप शांत होत नाही तोच आता आणखी एका अभिनेत्रीने गंभीर आरोप केले आहेत. ही अभिनेत्री केवळ गंभीर आरोप करून थांबलेली नाही तर तिने यापेक्षा मेलेलं बरं असा उद्विग्न विधानही केलं आहे.
मोनिका भदौरिया असं या अभिनेत्रीचं नाव आहे. मोनिकाने तारक मेहतामध्ये बावरीची व्यक्तिरेखा साकारली होती. या मालिकेत ती बागाची प्रेमिका दाखवलेली आहे. विसराळू आणि अल्लड मुलीची व्यक्तिरेखा तिने अप्रतिमपणे साकारली होती. जेनिफरप्रमाणेच मोनिकानेही असित मोदींवर आरोप केले आहेत. असित मोदी आपला पेमेंट रोखून ठेवतात. मानसिक छळ करतात, असा आरोप मोनिकाने केला आहे.
मोनिका एवढ्यावरच थांबली नाही तर तिने तारक मेहता मालिकेची तुलना आत्महत्येशी केली आहे. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत तिने हे टोकाचं विधान केलं आहे. मला या शोमध्ये सर्वाधिक टॉर्चर करण्यात आलं. त्यामुळे या शोमध्ये काम करण्यापेक्षा आपण मेलेलं बरं असं नेहमी वाटायचं, असं तिने सांगितलं.
तिला मेंटली टॉर्चर केल्याचा दावाही तिने केला आहे. माझ्यावर निर्माते असित मोदी चिडायचे. माझ्याशी गैरवर्तन केल जायचं, असं तिने सांगितलं. तुला पैसे मिळतात ना, त्यामुळे जे सांगितलं जाईल ते कर असं मला सोहेल म्हणाला होता, असा दावा मोनिकाने केला आहे. सोहेल हा तारक मेहता का उल्टा चश्माचा एक्झिक्युटिव्ह प्रोड्यूसर आहे.
बावरीच्या व्यक्तीरेखेतून मोनिका भदौरिया प्रचंड लोकप्रिय झाली होती. 2013पासून ती या सीरिअलमध्ये काम करत आहे. अनेक वर्ष काम केल्यानंतर तिने अखेर ही मालिका सोडली. मोनिकाने हा शो सोडल्यानंतर तिच्या जागेवर नविना वाडेकरला रिप्लेस करण्यात आलं आहे. सध्या नविना बावरीचा रोल करत आहे. जानेवारीपासूनच नविना या शोमध्ये दाखल झाली आहे.