ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी (Usha Nadkarni) या ‘सुंदर आमचं घर’ (Sundar Aamcha Ghar) या मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. या मालिकेत उषा या पूर्णपणे वेगळ्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्यासोबत सुकन्या मोने, सतीश पुळेकर आणि संचिता कुलकर्णी हे कलाकार देखील दिसणार आहेत. या मालिकेनिमित्त ‘ई टाइम्स’ला दिलेल्या एका मुलाखतीत उषा नाडकर्णी यांनी त्यांच्या नवीन भूमिकेबद्दल, टीव्ही इंडस्ट्रीमध्ये झालेल्या बदलांबद्दल, नवोदित कलाकारांबद्दल त्यांना काय वाटतं, याबद्दल सांगितलं. यावेळी त्यांनी इंडस्ट्रीतील काही कलाकारांना टोलादेखील लगावला. हल्लीच्या अभिनेत्री या अभिनयापेक्षा आयलाईनवरच जास्त फोकस करतात, असं त्या म्हणाल्या. शिवाय कलाकारांच्या मराठी उच्चारांवरूनही त्यांनी शाळा घेतली.
“छोट्या पडद्यावर काम करण्यास नकार देणारे ओव्हरस्मार्ट”
“मी काही कलाकारांना पाहिलंय, जे म्हणतात की ते आता टीव्हीवर काम करणार नाहीत. कारण ते चित्रपटांमध्ये काम करत आहेत. मला वाटतं की ते ओव्हरस्मार्ट वाटतात आणि त्यांना असं वाटतं की त्यांच्या हाती कोणती तरी सुपरपॉवर आहे. मी माझ्या कारकिर्दीत अनेकांना पाहिलंय, की आधी अभिनेते टीव्हीबद्दल बरंवाईट बोलतात, नंतर चित्रपट निवडतात आणि जेव्हा त्यांना एकही चित्रपट मिळत नाही किंवा त्यांचे चित्रपट चालत नाहीत, तेव्हा ते पुन्हा टीव्हीकडे वळतात. माझ्याबाबतीत असं नाहीये. माझ्यासाठी अभिनय महत्त्वाचा आहे, मी माध्यमाची पर्वा करत नाही. मग ती वेब सीरिज असो, टीव्ही सिरिअल असो किंवा चित्रपट असो, चांगले काम असेल तर मी नक्की करेन”, असं त्या म्हणाल्या.
“नवोदितांचा अभिनयापेक्षा ग्लॅमरवर फोकस जास्त”
नवोदित कलाकारांबद्दल बोलताना त्या पुढे म्हणाल्या, “मी माझ्या आयुष्यात अगदी लहान वयातच काम करायला सुरुवात केली. मी आता 75 वर्षांची आहे आणि अजूनही काम करतेय आणि लोकांना माझं काम आवडतंय हे मला माहीत आहे. मी कामावर जास्त लक्ष केंद्रित केलं, पण इंडस्ट्रीत येणारे नवोदित कलाकार हे त्यांच्या अभिनयकौशल्यापेक्षा ग्लॅमरवर अधिक लक्ष केंद्रित करताना दिसतात. दुर्दैवाने, आजच्या अभिनेत्रींचं फोकस हे डोळ्यांच्या हावभावापेक्षा आयलाईनरवर जास्त असतं. त्या बॉलिवूड किंवा इतर कोणत्याही प्रादेशिक उद्योगात केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी येतात.”
नवोदितांना सल्ला
“आजच्या पिढीतील अभिनेते आणि अभिनेत्रींनी हे समजून घेतलं पाहिजे की लोकांनी त्यांना त्यांच्या कामासाठी लक्षात ठेवलं पाहिजे, त्यांच्या लूकसाठी नाही. मी अशा अनेक अभिनेत्री पाहिल्या आहेत ज्यांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत फ्लॉप कामं केली आहेत. कारण त्यांनी नेहमीच ते कसे दिसतात यावर अधिक लक्ष केंद्रित केलं आहे. प्रत्येक अभिनेत्याने हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपण इथं लोकांचं मनोरंजन करण्यासाठी आलो आहोत. लोकांनी तुमच्या अभिनयकौशल्याची प्रशंसा करावी”, असा सल्ला त्यांनी नवोदितांना दिला.
निळू फुलेंचं उदाहरण
“मी सुंदर दिसत नाही, हे मान्य करते. पण गेल्या अनेक दशकांपासून मी इथे काम करतेय. निळू फुलेसुद्धा दिसायला काही खास नव्हते किंवा त्यांच्याकडे सिक्स-पॅक अॅब्स नव्हते. पण लोक त्यांच्यावर प्रेम करतात. लोक त्यांच्यासाठी वेडे होते. लोक फक्त त्यांचं काम पहायला थिएटरमध्ये जायचे. ते आयुष्याच्या शेवटपर्यंत काम करत होते. लोकांनी हे समजून घेतलं पाहिजे”, असं त्या म्हणाल्या.
“मराठी स्पष्ट बोलता येत नसतानाही इंडस्ट्रीत आहेत”
उषा नाडकर्णी यांनी काही कलाकारांच्या कामाबद्दल निराशा व्यक्त केली. याविषयी त्या म्हणाल्या, “असे काही कलाकार आहेत ज्यांना मराठी अस्खलित आणि स्पष्ट बोलताही येत नाही. त्यांना काम करताना पाहून मला खूप वाईट वाटतं. त्यांनी आधी त्यांचे उच्चार स्पष्ट करावेत आणि नंतर इंडस्ट्रीत यावं. ते ‘पाणी’ऐवजी ‘पानी’ म्हणतात, त्यांना मराठीत स्पष्ट एक ओळही म्हणता येत नाही पण ते इंडस्ट्रीत आहेत. मी जेव्हा जेव्हा त्यांना पाहते, तेव्हा मला भयंकर राग येतो.”
हेही वाचा:
‘काढण्यासारखं थोडं काही, वेचण्यासारखं खूप काही’; ‘झुंड’बाबत ‘धुरळा’च्या लेखकाची पोस्ट चर्चेत
सोनम कपूरच्या सासऱ्यांना लागला 27 कोटी रुपयांचा चुना; जाणून घ्या, कशी झाली ही फसवणूक?