हिंदी प्रमाणेच बिग बॉस मराठी हा देखील छोट्या पडद्यावरील खूप लोकप्रिय शो आहे. आतापर्यंत बिग बॉस मराठी (Bigg Boss Marathi 4) शोचे तीन सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. प्रत्येक सिझनला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला. फिल्म इंडस्ट्रीसोबतच विविध क्षेत्रातील प्रसिद्ध सेलिब्रिटी बिग बॉसच्या घरात प्रवेश करतात आणि काही काळ एकत्र राहतात. या घरात स्पर्धकांमध्ये खेळले जाणारे खेळ, त्यांच्यातील वादविवाद हे सर्व पहायला प्रेक्षकांना आवडतं. लवकरच या शोचा चौथा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण या नव्या सिझनसाठी वाहिनीला सूत्रसंचालक (Show Host) मिळत नसल्याचं कळतंय.
गेल्या तीन सिझनपासून या शोचं सूत्रसंचालन हे दिग्दर्शक, अभिनेते आणि निर्माते महेश मांजरेकर करत आहेत. प्रत्येक सिझनमध्ये ते ज्या पद्धतीने नि:पक्षपातीपणे स्पर्धकांशी संवाद साधतात, ते प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. त्यांची शैली लोकांना खूप आवडते. पण या नव्या सिझनचं सूत्रसंचालन महेश मांजरेकर हे करू शकणार नाहीत असं कळतंय. महेश मांजरेकर सध्या अनेक चित्रपटांच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. यासोबतच ते काही बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम करत आहे.
वास्तविक महेश मांजरेकर हे बिग बॉसला पुढील तीन महिन्यांची कमिटमेंट देऊ शकत नाहीत आणि त्यामुळेच चॅनल आता दुसऱ्या अँकरच्या शोधात आहे. यासाठी वाहिनीने लोकप्रिय अभिनेते नाना पाटेकर यांच्याशी संपर्क साधल्याचं वृत्त आहे. पण, नानांनी हा कार्यक्रम होस्ट करण्यासही नकार दिला आहे.
एकीकडे वाहिनीकडून शो होस्ट करण्यासाठी मराठीतील काही मोठ्या नावांशी संपर्क साधला जात आहे. तर दुसरीकडे चॅनल पुन्हा एकदा महेश मांजेरकर यांच्या पुढील तीन महिन्यांच्या वेळापत्रकासह तारखा निश्चित करण्याचा प्रयत्न करत आहे. महेश मांजरेकर यांची जागा नाना पाटेकर हे योग्य पद्धतीने घेऊ शकले असते, पण आता नानांनी नकार दिल्यानंतर या सिझनचं सूत्रसंचालन कोण करणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.