अभिनेता सलमान खान याच्या घरावर गोळीबाराची घटना रविवारी पहाटे घडली. या घटनेनंतर मोठी खळबळ बघायला मिळाली. सलमान खान याच्या घरावर गोळीबार झाल्यानंतर हल्लेखोरांना पकडण्यासाठी तब्बल 20 पथके पोलिसांची तयार करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणात कसून चाैकशी करण्यास सुरूवात केली. गोळीबाराच्या घटनेनंतर पोलिसांकडून हे स्पष्ट करण्यात आले की, आरोपी हे मुंबईतील नसून इतर राज्यातील आहेत. या गोळीबार प्रकरणातील काही सीसीटीव्ही फुटेज देखील पुढे आले. एका फुटेजमध्ये तर हल्लेखोरांचा चेहरा स्पष्ट दिसत होता. या हल्लेखोरांना पकडणे पोलिसांसमोर मोठे आवाहन नक्कीच होते.
गोळीबाराच्या घटनेनंतर अवघ्या काही तासांमध्येच पोलिसांनी हल्लेखोरांच्या मुसक्या आवळल्या. या आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी मोठी शक्कल लढवली. आरोपींना पकडण्यासाठी पोलिस मंदिरात भाविक म्हणून गेले. आरोपींना पळून जाण्याची एकही संधी मिळू नये, याकरिता गुन्हे शाखेचे अधिकारी थेट भाविक बनले.
हल्लेखोर भुजच्या माता नु मढ मंदिरात लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी भाविकांच्या वेशात मंदिरात प्रवेश केला. यावेळी हल्लेखोर विक्की गुप्ता आणि सागर पाल बेसावधपणे मंदिराच्या कोपऱ्यात झोपले होते. यावेळी पोलिसांनी या दोन्ही हल्लेखोरांच्या मुसक्या आवळल्या. हल्लेखोरांना काही कळण्याच्या आतच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे दोन्ही हल्लेखोर आता मुंबई पोलिसांच्या ताब्यात असून 10 दिवसांची पोलिस कोठडी त्यांना सुनावण्यात आलीये. आता पोलिस हल्लेखोरांकडून कसून चाैकशी करणार आहेत. हल्लेखोर या प्रकरणात काही मोठे खुलासे करू शकतात. हे दोन्ही हल्लेखोर बिहारमधील रहिवाशी असून काही महिन्यांपूर्वीच मुंबईत दाखल झाले होते आणि पनवेलमध्ये त्यांनी फ्लॅट खरेदी केला होता.
सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्याच्या अगोदर यांनी घराची रेकी देखील केल्याची माहिती उघड होत आहे. काही महिन्यांपासून या गोळीबाराचे प्लनिंग सुरू होते. हेच नाही तर मुंबई पोलिसांकडून या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई याची देखील चाैकशी केली जाऊ शकते. या गोळीबाराची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई याच्याच भावाने घेतलीये. लॉरेन्स बिश्नोई हा सलमान खान याला काही दिवसांपासून जीवे मारण्याच्या धमक्या देत आहे.