Mumtaz – Shammi Kapoor Love story : आज देखील ६० आणि ७० च्या दशकातील अभिनेत्रींच्या सौंदर्याची चर्चा होत असते. त्या काळच्या अभिनेत्रींचं सौंदर्य, हेअर स्टाईल आणि अभिनय आजही चर्चेत आहे. अशाच सुंदर अभिनेत्रींपैकी एक म्हणजे मुमताज… (Mumtaz) मुमताज यांच्या सौंदर्याची चर्चा आजही तुफान रंगत असते. फक्त चाहतेच नाही तर, अनेक सेलिब्रिटी देखील त्यांच्या सौंदर्यापुढे घायाळ झाले. एक अभिनेता मुमजात यांच्यासाठी सर्वकाही करण्यासाठी तयार होता. पण त्यांची लव्हस्टोरी काही कारणांमुळे पूर्ण होवू शकली नाही. मुमताज यांच्यासाठी सर्वकाही करणारे अभिनेते दुसरे तिसरे कोणी नसून अभिनेते शम्मी कपूर (Shammi Kapoor) होते.
बॉलीवूडचे दिग्गज कलाकार शम्मी कपूर आणि मुमताज यांच्यावर एक गाणं चित्रीत करण्यात आलं होतं. त्या गाण्याचं नाव होतं, ‘आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे’. आज देखील हे गाणं चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे. तेव्हा शम्मी कपूर आणि मुमताज यांच्या ऑनस्क्रिन केमिस्ट्रीने सर्वांचं मन जिंकलं. चाहत्यांच्या मनात देखील दोघांनी घर केलं.
‘आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे’ हे गाणं होतं ‘ब्रह्मचारी’ सिनेमातलं… ‘ब्रह्मचारी’ असा एक सिनेमा होता, ज्या माध्यमातून मुमताज आणि शम्मी कपूर यांची जोडी पहिल्यांदा चाहत्यांच्या भेटीस आली. सिनेमाच्या शुटिंग दरम्यान शम्मी कपूर, मुमताज यांच्या प्रेमात पडले. एवढंच नाही तर, शम्मी कपूर देखील मुमताज यांचे पहिले क्रश होते.
जेव्हा शम्मी कपूर यांना मुमताज यांच्या क्रशबद्दल माहिती झालं, तेव्हा त्यांना प्रचंड आनंद झाला. त्यांच्या मनात मुमताज यांच्याबद्दल असलेलं प्रेम आणखी वाढलं. बॉलिवूडमध्ये मुमताज आणि शम्मी कपूर यांच्या नात्याच्या चर्चा तुफान रंगल्या. दोघांच्या प्रेमामध्ये कधी त्यांच्या वयाचं अंतर आलं नाही. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर शम्मी कपूर यांनी त्यांच्या मनातील भावना मुमताज यांच्याकडे व्यक्त केल्या.
मुमताज यांच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवत शम्मी कपूर यांनी अभिनेत्रीपुढे एक अट ठेवली. लग्नानंतर सिनेमांमध्ये काम करता येणार नाही… अशी अट मुमताज यांना शम्मी कपूर यांनी घातली. तेव्हा मुमताज फक्त आणि फक्त १७ वर्षांच्या होत्या. शम्मी कपूर यांची अट ऐकल्यानंतर मुमताज यांना मोठा धक्का बसला.
शम्मी कपूर यांची अट ऐकल्यानंतर मुमताज यांनी लग्नासाठी नकार दिला. तेव्हा शम्मी कपूर, मुमताज यांच्यापेक्षा २० वर्षांनी मोठे होते आणि प्रसिद्ध अभिनेते होते. पण मुमताज यांना स्वतःचं करियर करायचं होतं. मुमताज यांचा नकार ऐकल्यानंतर शम्मी कपूर यांनी अभिनेत्रीसोबत लग्न न करण्याचा निर्णय घेतला.
एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून स्वतःचं नाव कमावण्याचं स्वप्न अखेर मुमताज यांनी पूर्ण केलं. मुमताज यांच्यापासून विभक्त झाल्यानंतर शम्मी कपूर यांनी नीला देवी यांच्यासोबत लग्न केलं. तर १९७४ साली मुमताज यांनी मयूर मधवानी यांच्यासोबत लग्न केलं.