मुंबई : सुदिप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करतोय. या चित्रपटावरून जितका वाद सुरू आहे, त्याचा चांगलाच फायदा कमाईत होताना दिसतोय. ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाला आधी मर्यादित स्क्रीन्स मिळाले होते. काही राज्यांमध्ये विरोध आणि काही राज्यांमध्ये बंदी आणूनही चित्रपटाला प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळतोय. पहिल्या वीकेंडला चित्रपटाच्या कमाईत 30 टक्क्यांहून अधिक वाढ पहायला मिळाली. तर प्रदर्शनानंतर पहिल्या वर्किंड डेला म्हणजेच सोमवारीसुद्धा शानदार कमाई झाली. ‘द केरळ स्टोरी’ने पहिल्या वीकेंडला 35.25 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.
अदा शर्माची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाला माऊथ पब्लिसिटीचा चांगला फायदा होत आहे. देशभरात सुरू असलेल्या वादामुळे चित्रपटात नेमकं असं काय दाखवण्यात आलं आहे, याचीही उत्सुकता प्रेक्षकांना आहे. त्यामुळेच थिएटरमध्ये चांगली गर्दी होतेय. याआधी विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटावरूनही असाच वाद झाला होता. ‘द केरळ स्टोरी’च्या पहिल्या दिवसाची कमाई ही ‘द काश्मीर फाइल्स’च्या कमाईपेक्षा अधिक होती.
सोमवारी ‘द केरळ स्टोरी’ने जवळपास 15 कोटी रुपयांची कमाई केली आहे. गेल्या चार दिवसांत या चित्रपटाने 46 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. महाराष्ट्र आणि केरळ राज्यात प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. या दोन्ही राज्यांमधील मर्यादित थिएटर्समध्ये चित्रपट प्रदर्शित होऊनसुद्धा प्रेक्षक गर्दी करताना दिसत आहे. येत्या काही दिवसांत हा चित्रपट 100 कोटींचा टप्पा पार करू शकतो, असा अंदाज चित्रपट व्यापार विश्लेषक वर्तवत आहेत. ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट अवघ्या 40 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे. बजेटची ही रक्कम पहिल्या चार दिवसांत वसूल झाली आहे.
या चित्रपटातील अभिनेत्री अदा शर्माच्या अभिनयाचं खूप कौतुक होत आहे. केरळमधल्या तीन मुलींची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी या तिघींचं आधी ब्रेनवॉश केलं जातं. नंतर त्यांना ब्लॅकमेल करून बळजबरीने ISIS या दहशतवादी संघटनेत सामील केलं जातं.
केरळ हायकोर्टाने या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये कोणत्याही विशिष्ट समुदायाबद्दल आक्षेपार्ह असं काहीच न दाखवल्याने कोर्टाने स्थगिती देण्यास नकार दिला. त्याचप्रमाणे सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाचं परीक्षण करून त्याला सर्टिफिकेट दिल्याने थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यासाठी तो योग्य असल्याचं कोर्टाने नमूद केलं आहे. या चित्रपटात अदा शर्मा, योगिता बिहानी, सिद्धी इनानी आणि सोनिया बिहानी यांच्या मुख्य भूमिका आहेत.