मुंबई : अभिनेत्री अदा शर्मा स्टारर ‘द केरळ स्टोरी’(The Kerala Story) सिनेमाची चर्चा सध्या देशभरात रंगत आहे. अनेक ठिकाणी ‘द केरळ स्टोरी’ सिनेमाचा विरोध करण्यात आला, तर अनेक ठिकाणी सिनेमाला बॅन देखील करण्यात आलं आहे. पण सिनेमाची चर्चा दिवसागणिक वाढताना दिसत आहे. होणाऱ्या वादाचा कोणताही परिणाम सिनेमावर झाला नाही. आजही अनेक ठिकाणी सिनेमाला विरोध होत असल्याचं दिसून येत आहे. पण तरी देखील बॉक्स ऑफिसवर सिनेमा तगडी कमाई करताना दिसत आहे. सिनेमात अदा शर्मा हिने साकारलेल्या भूमिकेची देखील तुफान चर्चा रंगत असून अभिनेत्रीच्या अभिनयाचं सर्वच स्थरातून कौतुक होत आहे. पण अदासाठी मुख्य भूमिका साकारणं फार कठीण होतं.
‘द केरळ स्टोरी’ सिनेमात अदा शर्मा हिने शालिनी उन्नीकृष्णन नावाच्या मुलीची भूमिका साकारली आहे. शालिनी उन्नीकृष्णन ही एक हिंदू मुलगी आहे. पण ती एका मु्स्लीम मुलाच्या प्रेमात पडते आणि त्या मुलासोबत निकाह करते. त्यानंतर शालिनी हिचा पती तिला ISIS मध्ये पाठवून देतो. सिनेमात शालिनी उन्नीकृष्णन हिची भूमिका साकारताना अभिनेत्री घाबरली होती.
अदा शर्मा सांगते की, ज्या दिवसापासून तिने शालिनीची कथा ऐकली त्या दिवसापासून सिनेमाच्या शूटिंगपर्यंत तिला एवढंच समजलं होतं की शालिनी दहशतवादाच्या जाळ्यात अडकलेली एक निष्पाप मुलगी आहे. ‘शालिनी उन्नीकृष्णन यांची भूमिका साकारताना मी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खूप घाबरले होते. ही गोष्ट मी आयुष्यभर विसरु शकत नाही…’
पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘लोकांना जागरूक करण्यात हा सिनेमा यशस्वी होत आहे याचा मला आनंद आहे. यातून एखाद्याचा जीवही वाचला, तर सिनेमा बनवण्याचा उद्देश पूर्ण होईल. जीवनात कोणताही निर्णय घेण्यापूर्वी दोनदा विचार करावा. गरज भासल्यास आपल्या ज्येष्ठांचेही मत घेतलं पाहिजे. असं देखील अभिनेत्री म्हणाली…
‘द केरळ स्टोरी’ सिनेमा 5 मे रोजी प्रदर्शित झाला होता. रिलीजच्या पहिल्याच दिवशी सिनेमाने 8 कोटींची कमाई केली. सिनेमाने पहिल्या वीकेंडमध्ये एकूण 35 कोटींची कमाई केली. सोमवारी सिनेमाने तब्बल जवळपास ११ कोटींची कमाई केली, ज्यामुळे सिनेमाचं कलेक्शन 46 कोटी रुपयांवर पोहोचलं. रिपोर्ट्सनुसार, सिनेमाने रिलीजच्या पाचव्या दिवशी ११ कोटी रुपयांचा गल्ला जमा केला. अशा प्रकारे सिनेमा ५ दिवसात ५० कोटींहून अधिक कमाई केली आहे.