मुंबई : ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत असला तरी देशभरात त्यावरून अद्याप वाद सुरूच आहे. चित्रपटात सांगितलेला 32 हजार महिलांचा आकडा, धर्मांतर या सर्व मुद्द्यांवरून चित्रपटाच्या निर्मात्यांना आणि दिग्दर्शकांना घेरण्यात येतंय. यावर अखेर दिग्दर्शक सुदिप्तो सेन आणि निर्माते विपुल शाह यांनी मौन सोडलं आहे. ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट प्रचारकी असल्याच्या आरोपांना त्यांनी फेटाळलं आहे. चित्रपटाच्या टीमने नुकतीच मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी केरळमधल्या काही पीडित मुलींनाही मंचावर सर्वांसमोर आणलं होतं.
आरोपांना उत्तर देताना निर्माते विपुल शाह म्हणाले, “शोले या चित्रपटात गब्बर सिंग खलनायक होता. पण याचा अर्थ असा होत नाही की रमेश सिप्पी साहेब हे सिंग समुदायाच्या विरोधात होते. सिंघम चित्रपटातील खलनायक हिंदू होता. त्याचा अर्थ असा नाही की हिंदू वाईट असतात. मग आमच्या विरोधात असा विचार का? आम्ही तर फक्त अपराधींबद्दल बोलतोय.”
चित्रपटात एकाही मुस्लिम व्यक्तीची भूमिका चांगली का नाही दाखवली असा प्रश्न विचारला असता दिग्दर्शक सुदिप्तो सेन म्हणाले, “आम्ही इथे समतोल साधण्यासाठी नाही आहोत. संपूर्ण देश या समस्येचा सामना करतोय. जेव्हा आपण दहशतवादाविषयी बोलतो, तेव्हा आपण थेट एका धर्मालाच टारगेट करतोय असा पूर्वग्रह करू शकत नाही. उलट आम्ही इस्लाम धर्माची खूप मोठी सेवा केली आहे.”
यावेळी सुदिप्तो सेन हे केरळ या राज्याविषयीही मोकळेपणे व्यक्त झाले. केरळचा एक भाग निसर्गसौंदर्य, कला यांनी परिपूर्ण आहे. तर दुसरा भाग हा दहशतवादाचा नेटवर्क हब बनलाय, असं ते म्हणाले. 32 हजार महिलांचं धर्मांतर करून त्यांना दहशतवादाकडे वळवण्याच्या दाव्यावर काही राजकीय पक्षांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर निर्माते म्हणाले, “आम्ही 32 हजार मुलींची कथा तीन मुलींच्या माध्यमातून दाखवली आहे. लोकांनी 32 हजारच्या आकड्यावरून आमच्यावर टीका केली. पण आम्ही त्यांचीच कथा या तिघींच्या माध्यमातून समोर आणली आहे.”
‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट या वर्षातील दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. अवघ्या 12 दिवसांत या चित्रपटाने कमाईचा 150 कोटींचा आकडा पार केला आहे. रणबीर कपूरच्या ‘तू झुठी मैं मक्कार’ आणि सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटांना मागे टाकलं आहे.