मुंबई : विपुल शाह निर्मित ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. देशभरात या चित्रपटाने कमाईचा 200 कोटींचा टप्पा पार केला आहे. थिएटरमध्ये दमदार कामगिरी केल्यानंतर आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. ‘द केरळ स्टोरी’च्या ओटीटी प्रीमियरबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. ‘द केरळ स्टोरी’च्या हिंदी व्हर्जनचे डिजिटल हक्क झी5 या ओटीटी प्लॅटफॉर्मने विकत घेतल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांना झी5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे. ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटात अदा शर्मा, योगिता बिहानी, सिद्धी इदनानी आणि सोनिया बलानी यांच्या भूमिका आहेत. थिएटरमध्ये या चित्रपटाचा चौथा आठवडा असून कमाईचा आकडा जवळपास 225 कोटी रुपयांच्या घरात पोहोचला आहे.
झी5 ने जरी या चित्रपटाचे ओटीटी हक्क विकत घेतले असले तरी अद्याप हा चित्रपट थिएटरमध्ये कमाई करत आहे. त्यामुळे ओटीटीवर प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आली नाही. सहसा थिएटरमधून चित्रपट बाहेर पडल्यानंतर चार आठवड्यांमध्ये तो ओटीटीवर उपलब्ध होतो. कधी कधी औपचारिक प्रक्रिया लांबल्यामुळे त्याहीपेक्षा जास्त काळ लागू शकतो.
‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट प्रचारकी असल्याची टीका दिग्दर्शक अनुराग कश्यप, अभिनेते कमल हासन आणि नसीरुद्दीन शाह यांनी केली आहे. “मी प्रचारकी चित्रपटांच्या विरोधात आहे. चित्रपटाच्या शेवटी फक्त ‘खरी कथा’ असा लोगो लावून चालत नाही. तर कथासुद्धा खरी असावी लागते आणि हा चित्रपट खरा नाही”, अशा शब्दांत कमल हासन यांनी चित्रपटावर टीका केली होती. तमिळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाच्या प्रदर्शनाला बंदी घालण्यात आली आहे.
चित्रपट प्रचारकी असल्याच्या आरोपांवर दिग्दर्शक सुदिप्तो सेन यांनी सडेतोड उत्तर दिलं होतं. “जर भाजपला हा चित्रपट आवडत असेल तर त्याचा अर्थ असा नाही की हा त्यांचा चित्रपट आहे. फक्त भाजपच नाही तर काँग्रेस आणि इतर राजकीय पक्ष.. आंतरराष्ट्रीय स्तरावरील 37 देशांना आणि लोकांना हा चित्रपट आवडतोय. जरी त्यांना टीका करायची असेल तरी ते मला कॉल करून माझ्यासोबत चर्चा करत आहेत. मला त्याबद्दल कोणताच पश्चात्ताप नाही. या चित्रपटाला प्रचारकी म्हणून आणि तो न पाहताच त्याच्याबद्दल मत व्यक्त करून ती व्यक्ती स्वत: प्रचारकी गोष्टींमध्ये सहभागी झाली आहे. याला दुटप्पीपणा किंवा ढोंगीपणा याशिवाय आणखी काय म्हणावं? मी त्यांना स्पष्टीकरण देणं थांबवलंय”, असं ते म्हणाले होते.